MLA Govardhan Sharma’s birth anniversary today : आमदार गोवर्धन शर्मा यांची आज जयंती
akola-सलग तीस वर्षे मतदारांच्या मनावर राज्य करणारे लालाजी उर्फ दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांची आज जयंती. दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवशीच लालाजींचा वाढदिवस येत असल्याने त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागत होती. आज त्यांच्या या आठवणींना उजाळा देत लालाजींना आदरांजली वाहण्यात आली.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आलेले आमदार गोवर्धन शर्मा यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळ हळहळले होते. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना आदरांजली वाहताना पक्षासाठी लालाजींनी दिलेल्या योगदानाबद्दल व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्न यामुळेच अकोला शहरात भाजपला आपली पाळेमुळे अधिक घट्ट करता आले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. केवळ राजकारणांमध्येच नव्हे तर सर्वसामान्यांमध्येही लालाजी अतिशय लोकप्रिय होते. सुखदुःखात नेहमी धावून जाणारे लालाजी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा हा सेवाभाव शर्मा कुटुंबियांनीही आवर्जून जोपासला आहे.
संजू भाऊ व लालाजींची मैत्री
माजी खासदार संजय धोत्रे व दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांची चांगली मैत्री होती. राजकारणात एकाच वेळी दोघांनीही जम बसवला होता. अकोला जिल्ह्यातील पक्ष संघटनेवर संजू भाऊंची जेवढी पकड होती तेवढीच पकड लालाजींनी शहरातील पक्ष संघटनेवर बसवली होती. आज लालाजी आपल्यात नसले तरी संघटनेवरील त्यांचा प्रभाव अजूनही जाणवतो. संजू भाऊ आजारपणामुळे अंथरुणावर खिळले आहे. पक्ष संघटनेत या दोन्ही नेत्यांची उणीव भाजपला नेहमीच जाणवणार आहे.
वारसदारांचे राजकीय पुनर्वसन होणार का?
संजू भाऊ आणि लालाजी ही अकोल्यातील राजकीय वर्तुळातील जोडी एकाच वेळी राजकारणात आली. संजू भाऊंच्या आजारपणानंतर त्यांचा वारसदार म्हणून पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने खासदार होण्याची संधी देऊन त्यांचे पुनर्वसन केले. लालाजींच्या निधनानंतर मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या नशिबी हा योग आला नाही विधानसभा निवडणुकीत संधी असतानाही शर्मा कुटुंबाला उमेदवारी नाकारण्यात आली आता लालाजींच्या वारसदारांचे राजकीय पुनर्वसन होणार का असा प्रश्न भाजपच्या गोटातून विचारला जात आहे.