Leopard skin seized from smugglers : गडचिरोलीतील कोरचीतून घेतले ताब्यात, वन विभागाची कारवाई
Sadak Arjuni सडक अर्जुनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी वाघ आणि बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली होती. या तीन आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दोन आरोपींना गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे जप्त केले.
नकुल प्रल्हाद शहारे (५८) रा. कोहका व जितेंद्र गोविंदराम कराडे (३०) रा. कोडगूल ता.कोरची जिल्हा गडचिरोली असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन बुधवारी सापळा रचून वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत वन काेठडी सुनाविण्यात आली होती.
Devendra Fadnavis : गृहमंत्र्यांचे शहर हादरले, दोन महिन्यांत १३, बारा तासांत दोन हत्याकांड !
वन अधिकारी अविनाश मेश्राम, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, वनरक्षक अमोल चौबे, सतीश शेंद्रे, पुरुषोत्तम पटले, तरुण बेलकर, वन कर्मचारी मुधोळकर ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली. यानंतर याप्रकरणी गुरुवारी सापळा रचून गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथून नकुल प्रल्हाद शहारे व जितेंद्र गोविंदराम कराडे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे जप्त केले.
वन विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र घटनास्थळावरुन महेंद्र रामनाथ शहारे रा.कोहका ता. कारची, इंदर रामदास शहारे रा. गहाणागाटा ता. कोरची जिल्हा गडचिरोली, कारू टेंभुर्णे रा. दंडासूर ता. कोरची जिल्हा गडचिरोली हे तिन्ही आरोपी फरार झाले. त्यांचा शोध सुरू आहे. तर नकुल प्रल्हाद शहारे व जितेंद्र गोविंदराम कराडे या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दोन आरोपी व बिबट्याचे कातडे वनपरिक्षेत्र अधिकारी वडसा वन विभागाकडे सपूर्द करण्यात आले. या प्रकरणात आरोपींची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांनी सांगितले.