Domestic and foreign liquor worth crores seized in Wardha district : मद्यतस्करांवर रोज होते कारवाई तरीही पोलिसांचा धाक नाही
Wardha वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित होऊन आता पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. पण आजही सारंकाही कागदावरच आहे. यासंदर्भात अलीकडेच केंद्रीय गृहमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे. पण कोट्यवधीची देशी-विदेशी दारू पकडण्यात आल्यामुळे ‘दारूबंदी’च्या घोषणेची थट्टा सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे.
गेल्या वर्षभरात पोलिस विभागाने जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेत तब्बल कोट्यवधी रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करत दारू विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या. मात्र, तरीदेखील जिल्ह्यातून दारू हद्दपार झाली नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात दारूचे पाट वाहतात. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दररोज पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, तरीही काही मुजोर दारूविक्रेत्यांकडून आजही अवैध दारूविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे.
Wardha Accident : पोलीस कुटुंबाच्या अंत्यसंस्काराला गहिवरले समाजमन!
याला काही प्रमाणात पोलिसही कारणीभूत आहेत. ‘अर्थ’कारणातून पोलिसही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची बोंब संपूर्ण जिल्ह्यातच सुरू आहे. पोलिस विभागाकडून वेळोवेळी दारूविक्रेत्यांना हद्दपार केले जाते. अनेकांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारागृहात स्थानबद्धही करण्यात आले. मात्र, तरीही पोलिसांच्या नाकावर टिच्चून दारूविक्रेते आपला व्यवसाय अगदी ‘थाटात’ करीत असल्याचे दिसून येत आहे.
यावर ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी आता नागरिकांतून केली जात आहे. जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित असला तरी जिल्ह्यासाठी स्थानिक प्रशासकीय भवनात दारूविक्री व साठवणुकीवर वॉच ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. मात्र, या कार्यालयात उपयुक्त मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने कारवाईदेखील शून्य असल्याचे आजपर्यंतच्या पाहणीत पुढे आले आहे. त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय तरी कशाला, असा प्रश्नही त्यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
जानेवारी २०२५ ते मार्च या कालावधीत जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांतील पथकाकडून दारूविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारत लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त केला, तसेच शंभरावर दारूविक्रेत्यांना बेड्याही ठोकल्या. मात्र, तरीदेखील पूर्णत: दारूविक्रीवर अंकुश अद्यापही लागला नाही.








