Anger over Cooperation Minister Babasaheb Patil’s statement : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने संताप
Chopra : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर संकट कोसळत असताना कर्जमाफी आणि मदतीच्या मागण्या जोर धरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मदत जाहीर करण्याची तयारी सुरू असतानाच, सहकार मंत्री आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे.
चोपडा येथे एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले, “लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं असतं म्हणून निवडणुकीत काहीतरी आश्वासन द्यावंच लागतं. गावातील एखाद्याने नदी आणून द्या म्हटलं, तरी आम्ही होकार देतो. पण लोकांनी काय मागायचं, हे आधी ठरवलं पाहिजे.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त झालं, तर राज्यभरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
Arvind Sawant : ओला दुष्काळ जाहीर करा, ठाकरे गटाचा जिल्हा कचेरीत ठिय्या!
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर तीव्र टीका करताना म्हटलं, “बाबासाहेब पाटील हे लातूरसारख्या दुष्काळग्रस्त भागातून निवडून आलेले नेते आहेत. तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना ठाऊक आहे. तरीसुद्धा ते ‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय’ असं बोलत असतील, तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे.”
IPS Puran Kumar : देश हादरवणाऱ्या आयपीएस आत्महत्याप्रकरणी खळबळ !
राजू शेट्टी पुढे म्हणाले, “शेतकरी कर्जबाजारी का झाला, तर ते सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे. शेतकऱ्यांची चेष्टा करण्याऐवजी सरकारने वास्तव समजून घेतलं पाहिजे. केंद्राच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. एक जबाबदार मंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारकडे जाऊन सांगायला हवं की तुमच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. पण त्याऐवजी ते शेतकऱ्यांची थट्टा करत असतील, तर हा असंवेदनशीलतेचा आणि निर्लज्जपणाचा कळस आहे.”
दरम्यान, बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आघाडीमध्येही अस्वस्थता निर्माण झाली असून, विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या भावनांना धक्का देणारे हे वक्तव्य येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारसाठी राजकीय संकट ठरू शकतं, अशी चर्चा राज्यभर रंगली आहे.
____








