7 seats may increase in Amravati Zilla Parishad constituency : मतदारसंघांची संख्या ५९ वरून ६६ होण्याची शक्यता; ग्रामविकास विभागात घडामोडी
Amravati जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघांची संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय लोकसंख्येची माहिती मागवली आहे. सध्या जिल्हा परिषद मतदारसंघांची संख्या ५९ वरून ६६ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
गेल्या ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यभरातील थांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मार्ग मोकळा करून दिला. ओबीसी आरक्षणाचा अंतिम निर्णय होईपर्यंतही निवडणुका थांबवू नयेत, असे स्पष्ट करत न्यायालयाने चार आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रशासकीय तयारीला वेग आला आहे.
Buldhana Congress : तिरंगा यात्रेतून जवानांना सलाम, भाजपचा निषेध!
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २०१७ मधील आरक्षणाच्या सूत्रांनुसारच निवडणुका घेण्यात येणार आहेत. मात्र, त्या वेळची जागांची संख्या आणि सध्याची परिस्थिती यात फरक असल्यामुळे नेमक्या किती जागांसाठी निवडणुका घेण्यात याव्यात, यावर प्रशासनाचा भर आहे. २०१७ मध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्येच संपुष्टात आला होता. त्याआधीच सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी शासन व निवडणूक आयोगाने सुरू केली होती.
दरम्यान, राज्य शासनाने २०११ च्या जनगणनेऐवजी अद्याप प्रकाशित न झालेल्या २०२१ च्या जनगणनेनुसार निवडणुका घ्याव्यात, असे ठरवले. त्यामुळे सरासरी लोकसंख्या वाढ गृहीत धरून मतदारसंघांची फेररचना करण्यात आली. या फेररचनेत अमरावती जिल्हा परिषदेमध्ये ७ नव्या मतदारसंघांची भर पडली आहे. एकूण जागा ५९ वरून ६६ वर गेल्या आहेत.
या निवडणुकीत किती जागा असतील, याची स्पष्टता होण्यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हानिहाय लोकसंख्येची माहिती मागवली आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाकडे पूर्वीपासूनच तयार असून, तीच माहिती आता पुन्हा ग्रामविकास विभागाला पाठवली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. हीच माहिती राज्य निवडणूक आयोगालाही पाठविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.