Controversial statement by NCP MLA Prakash Solanke : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचं वादग्रस्त वक्तव्य
Beed : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून, राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “निवडणूक लढवण्यासाठी नुसता इच्छुक असून उपयोग नाही, तर तुमच्याकडे किती ‘दारूगोळा’ आहे, याची माहिती द्यावी लागेल,” असं वक्तव्य त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलं आहे.
आमदार सोळंके यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजलगाव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हे विधान केलं.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश सोळंके म्हणाले, “माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कसं मतदान घेतलं हे सगळ्यांना माहित आहे. शेवटच्या दोन दिवसांत कुणाला चपटी द्यावी लागते, कुणासाठी कोंबडं-बकरं कापावं लागतं, कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं. पण यात तुम्ही एक्सपर्ट बनलेले आहात.”
ते पुढे म्हणाले, “या निवडणुकीतही आपल्याला तोच अनुभव वापरावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या ‘दारूगोळ्याची’ माहिती द्यावी लागेल. निवडणूक लढवण्यासाठी नुसता उत्साह असला तरी उपयोग नाही, बंदुकीतून गोळ्या झाडाव्या लागतात.”
सोळंके यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना पुढे म्हटलं, “लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपण त्या पूर्ण करू शकत नसू, पण कुठेही कमी पडता कामा नये. समोरचा माणूस जर निवडणुकीत 100 रुपये खर्च करणार असेल, तर आपणही 100 रुपये खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे. विधानसभेपेक्षा चारपट अधिक वेगाने काम करावं लागेल आणि चारपटीने कष्ट घ्यावे लागतील.”
आमदार प्रकाश सोळंके यांच्या या ‘दारूगोळा’ संदर्भातील वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात टीकेची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं वक्तव्य केल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








