Former corporator slaps branch head, case directly to police station : माजी नगरसेवकाकडून शाखाप्रमुखाला चापट, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Thane : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून येत आहेत. खासकरून पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. या राड्यात भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला चापट लगावल्याचा गंभीर आरोप होत असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भाजप – शिवसेना एकनाथ शिंदे गटात वाद चिघळलेला दिसतोय. काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये प्रवेशासंदर्भात नाराजी वाढली आहे. या तणावामुळेच एकनाथ शिंदे गटाचे मंत्री थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार घेऊन गेले होते, तर स्वतः एकनाथ शिंदे दिल्लीतील बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांना यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. पक्षातील घडामोडींवरून निर्माण झालेला हा वाद आता दिल्लीपासून ठाण्याच्या रस्त्यांवर उतरल्याचे दिसत आहे.
Local body election : भाजप नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध; पुन्हा घराणेशाहीच्या चर्चा !
ठाण्यात बीएसयूपी घरांसाठी १०० रुपयांची रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करण्यासाठी इमारतीत सेलिब्रेशन करत होते. त्याचवेळी भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार तिथे पोहोचले आणि तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी असून इथे कसा जल्लोष करता? असा सवाल करत त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. वाद वाढत गेला आणि अखेर पवार यांनी थेट शाखाप्रमुखाला चापट मारल्याचा आरोप समोर आला. यानंतर हरेश महाडीक, महेश लहाने यांच्यासह उपविभाग प्रमुखालाही मारहाण झाल्याची तक्रार करण्यात आली. घटनेनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि परिसरात तणाव निर्माण झाला.
Sudhir Mungantiwar : ५३२ जीवनांना नवा प्रकाश: मुनगंटीवारांचा उपक्रम ठरला सेवाभावाचा दीप !
या मारहाणीचे प्रकरण थेट नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले असून रात्री उशिरा तक्रार नोंदवण्यात आली. पक्षातील आधीपासून असलेला प्रवेशावरचा वाद, नेत्यांनी वर पातळीवर केलेल्या तक्रारी आणि आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला संघर्ष महायुतीतील अंतर्गत मतभेद गंभीर पातळीवर गेल्याचे संकेत देत आहेत. ठाण्यातील हा संघर्ष भाजपा आणि शिंदे गटातील वाढत्या दरीचे आणखी एक उदाहरण ठरत असून आता राज्यातील मोठे नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
_______








