New developments in Mahavikas Aghadi in backdrop of the elections : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत नवी घडामोड
Mumbai: राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगला असून, विविध राजकीय पक्षांकडून तयारीला जोर आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची युती होण्याची चर्चा काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. या संभाव्य युतीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू असतानाच, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींना नवा ट्विस्ट दिला आहे.
संजय राऊत यांनी सांगितले की, “स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे. ही त्यांची भूमिका आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की यावर अंतिम निर्णय झाला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. राऊत म्हणाले, “या राज्यात प्रत्येक पक्षाचे एक वेगळे स्थान आहे. जसे शिवसेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शरद पवार साहेबांचे, डाव्या पक्षांचे तसेच काँग्रेसचेही आहे. काँग्रेस हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. काँग्रेसचा समावेश होणे गरजेचे आहे आणि ही भूमिका राज ठाकरे यांचीही आहे.”
Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच विधान केले होते की, “काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही. जर मनसेला आघाडीत घ्यायचं असेल, तर तो निर्णय दिल्लीतून होईल.” यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “त्यांचे म्हणणे योग्य आहे. आम्ही दिल्लीत चर्चा करत आहोत. काल माझी सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याशी काही विषयांवर चर्चा झाली. मी राहुल गांधींशी देखील चर्चा करणार आहे आणि उद्धव ठाकरे स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलतील. उद्याचे शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहे, हे सपकाळ यांनी समजून घ्यावे. हा विषय एका पक्षापुरता मर्यादित नाही.”
दरम्यान, संजय राऊत यांनी ठाण्यात मनसे आणि शिवसेनेच्या संयुक्त मोर्चाबाबतही प्रतिक्रिया दिली. “मनसे आणि शिवसेनेचा आज ठाण्यात मोर्चा आहे. ठाणे महापालिका हद्दीत गुंडगिरी आणि भ्रष्टाचार सुरू आहे. त्याविरोधात हा मोर्चा काढला जात आहे,” असे त्यांनी सांगितले. राऊत म्हणाले, “ठाणे महापालिका आयुक्तांना लाच घेताना अटक झाली. हे मिंधे गटाचे हस्तक होते. हे महाराष्ट्राला कलंक लावणारे काम आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी मोडून काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनाही वाचवले नाही. असेच आदेश ठाणे जिल्ह्यात द्यावेत,” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
या सर्व राजकीय घडामोडींमुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत आणि काँग्रेसच्या भूमिकेबाबत नव्या चर्चांना आता अधिक वेग आला आहे.
____








