29 women get opportunity in reservation of 57 gram panchayats : 57 ग्रामपंचायतींच्या आरक्षणात 29 महिलांना संधी
Gondia आगामी पंचवार्षिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमगाव तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींतील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ही आरक्षण प्रक्रिया तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. तहसीलदार मोनिका कांबळे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार सतीश वेलादी यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी अरुण गिऱ्हेपुंजे, नायब तहसीलदार चंद्रशेखर गजभिये, पंचायत समिती सभापती योगिताताई पुंड, उपसभापती सुनंदा उके यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही आरक्षण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने व नियमानुसार पार पडली. 2025 ते 2030 या कालावधीसाठी करण्यात आलेल्या आरक्षणात महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून एकूण 29 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिलांचा प्रभावी सहभाग राहणार आहे.
आरक्षणाचे तपशील पाहता, अनुसूचित जाती महिला – 3, अनुसूचित जाती सर्वसाधारण – 2, अनुसूचित जमाती महिला – 2, अनुसूचित जमाती सर्वसाधारण – 3, नागरिक प्रवर्गातील महिला – 6, नागरिक प्रवर्ग सर्वसाधारण – 5, सर्वसाधारण महिला – 18, तर सर्वसाधारण प्रवर्ग – 18 अशा प्रकारे एकूण 57 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींच्या हक्कावर स्टीलचं झाकण!
ही आरक्षण सोडत पाहण्यासाठी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी, नागरिक, विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संपूर्ण प्रक्रियेचे कौतुक करत महिलांना मिळालेल्या आरक्षणाचे स्वागत केले.
या आरक्षण प्रक्रियेमुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक प्रभावीपणे दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Harshawardhan Sapkal : काँग्रेस मैदानात; जातीय द्वेषाविरोधात थोपटणार दंड!
आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका आता अधिकच रंगतदार ठरणार असून प्रत्येक गटात आरक्षणानुसार उमेदवारांची निवड आणि प्रचार यास सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. सशक्त लोकशाहीसाठी ही आरक्षण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून आगामी काळात विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन मिळावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.








