Local Body Elections : प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, मैदान मारण्यासाठी आटापीटा

A watch kept on rival candidates : निवडणूक रंगात; देऊळगाव राजासह जिल्ह्यात जोरदार प्रचार

Deulgao Raja : बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकीत मुकाबले स्पष्ट झाल्यानंतर आणि अपक्षांना चिन्हे मिळताच प्रचाराला वेग आला आहे. काही प्रभागांमध्ये ‘सेटलमेंट’च्या चर्चांनी तापलेले वातावरण आणखी रंगतदार बनले असून प्रतिस्पर्धी उमेदवारांना चकवा देण्यासाठी विविध ‘डाव–प्रतिडाव’ खेळल्याचा आरोपही जोर धरत आहे. विरोधकांसोबतच घरातील काही सहकारी उमेदवारांवरही ‘वॉच’ ठेवली जात असल्याचे बोलले जाते.

नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार थेट घरदार ठोठावत आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक वाडी-विश्तीत जाऊन मतदारांना राजी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. प्रभागनिहाय व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे संवाद वाढवण्यात येत असून हे ग्रुप आता अत्यंत सक्रिय झाले आहेत.

Local Body Elections : अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये ‘त्या’ वर्षाची मतदार यादीच नाही

जिल्ह्यातील ४ लाख ७६ हजार ८५५ मतदार ११ नगरपालिकांच्या भाग्यरेषा आखणार आहेत. उमेदवारांनी गुप्त बैठका, मतदारांची गाठीभेटी, नाराज कार्यकर्त्यांची समेट मोहीम आणि बाहेरगावी असलेल्या मतदारांशी संपर्क वाढवला आहे. प्रभागनिहाय नव्याने दोन-दोन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून संवाद मोहीम तीव्र करण्यात येत आहे.

स्थानिक प्रचारासोबतच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभांसाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. प्रचाराला आता फक्त एकच दिवस शिल्लक असल्याने कार्यकर्त्यांनी ‘एक तरी सभा द्या’ असा आग्रह वरिष्ठांकडे केला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी जिल्ह्यात अनेक तगडे नेते येण्याची शक्यता आहे.

देऊळगाव राजासह अनेक शहरांत नागरिक पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर नाराज आहेत. रस्ते, नाले, स्वच्छता, पथदिवे याबाबत नागरिकांचे तक्रारींचे सूर उमटत आहेत. यापूर्वी निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना मतदार “आधी केलेले काम सांगा, मग पुढचे बोला” असा थेट जाब विचारत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

Local Body Elections : पश्चिम विदर्भातील ४० नगरपरिषद, ५ नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान

बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, शेगाव, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि मलकापूर या पालिकांसाठी मतदान २ डिसेंबरला होणार आहे. ३ डिसेंबरला निकाल जाहीर होऊन पुढील पाच वर्षांसाठीचे कारभारी निश्चित होतील. जिल्हाभर वातावरण दिवसेंदिवस तापत असून निवडणुकीचा रंग अधिक गडद होत आहे.