Local Body Elections : बावनकुळेंच्या कामठीत अजित पवार गटाची नवी राजकीय चाल !

Ajit Pawar group’s new political move in the BJP leader Chandrashekhar Bawankule’s Kamptee Constituency : काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शहाजहान अन्सारी असणार राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार

प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने अन्सारींचा प्रवेश; नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जवळपास निश्चित, स्थानिक राजकारणात पक्षांतराची नवी लाट

Nagpur : कामठी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठीत नवी खेळी करत काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष शहाजहान शाकाहात अन्सारी यांना आपल्या गोटात खेचले आहे. या घडामोडीमुळे येथील राजकीय समीकरणे अक्षरशः ढवळून निघाली आहेत.

Sudhir Mungantiwar : आपल्या पाठपुराव्यामुळे न्यायालय इमारतीला मंजुरी..आभारी आहोत, आ. सुधीरभाऊ!

काल (१६ नोव्हेंबर) रात्रीच अन्सारी यांनी कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला विशेष महत्त्व होते आहे. कारण अन्सारी यांना नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून जवळपास निश्र्चित मानले जात आहे. कामठीत अन्सारींचा मजबूत जनाधार आणि स्थानिक पातळीवरील त्यांची पकड लक्षात घेता, अजित पवार गटाचा हा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यावर थेट प्रहार म्हणून पाहिला जात आहे.

नगरपरिषद – नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनिष्ठा लयाला गेली असून पक्षांतराला अक्षरशः ऊत आला आहे. सत्तेची शक्यता जिथे दिसते, तिथे उमेदवार आणि पदाधिकारी धाव घेताना दिसत आहेत. कामठीच्या राजकारणातही याचेच प्रतिबिंब दिसत असून, सत्तेच्या इंजिनाला नवनवीन डबे जोडण्याची स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे.

शहाजहान अन्सारी यांचा प्रवेश म्हणजे काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. पूर्वी नगराध्यक्षपद भूषवलेल्या अन्सारी यांनी स्थानिक पातळीवर अनेक वर्षे प्रभावी राजकारण केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला या प्रवेशाचा थेट फायदा होईल, तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या रणनीतीवर त्याचा परिणाम होणार, हे निश्चित.

Local body election : परवापर्यंत युतीचं चित्र स्पष्ट होईल !

अजित पवार गटाने नागपूर जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही आठवड्यांत जोरदार कामगिरी करत आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. कामठी हा त्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. अन्सारींच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्तेही उत्साही झाले असून आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले आहे. एकूणच, कामठी नगरपरिषद निवडणुकीत राजकीय पुनर्बांधणी वेगाने सुरू असून, अजित पवार गटाच्या या खेळीने सत्तेचा समीकरणात्मक पट पूर्णपणे बदलून टाकला आहे.