Arvind Lodhi’s role is important in the Sunil Kedar Ashish Deshmukh clash in Saoner constituency : नगर विकास आघाडीचे उपद्रवमूल्य वाढले; केदार–देशमुख संघर्षात लोधींचा रोल महत्त्वाचा
Nagpur : सावनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्वात मोठे राजकीय समीकरण कोण बदलणार, तर ते अॅड. अरविंद लोधी यांच्या नगर विकास आघाडीचे पाऊल. अनेक वर्षांपासून या आघाडीच्या माध्यमातून अरविंद लोधी नगरसेवक म्हणून निवडून आले असून, नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. त्यामुळे त्यांची संघटना ही सावनेरच्या राजकारणातील स्थिर आणि प्रभावी ताकद मानली जाते.
सावनेरचा इतिहास पाहता, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांना नगरपरिषदेत रोखण्याचे काम नगर विकास आघाडीने अनेकदा केले आहे. त्यामुळे आमदारकी नसताना केदारांसाठी सावनेरची ही निवडणूक अधिकच आव्हानात्मक ठरणार आहे. यापूर्वी ही आघाडी भाजपसोबत असल्याने केदारांना मजबूत विरोध मिळत होता; मात्र आता ती आघाडी भाजपपासून वेगळी झाली आहे. त्यामुळे नगर विकास आघाडीचे उपद्रवमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
केवळ काँग्रेसच नव्हे, तर भाजपलाही या निवडणुकीत आघाडीचा फटका बसण्याची शक्यता प्रबळ आहे. सावनेरमधील स्थानिक पातळीवरील मतांचे विभाजन दोन्ही राष्ट्रीय पक्षांना नुकसानकारक ठरू शकते. विशेषतः काँग्रेससाठी ही वेळ अधिक कठीण आहे, कारण सुनील केदारांवर सावनेर विधानसभा मतदारसंघासोबतच संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे. पुढील निवडणुकांपूर्वी संघटना बळकट करण्यासाठी त्यांना सावनेरमध्ये अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
Nationalist Congress : रामटेकमध्ये अजित पवारांची ताकद वाढवणार चंद्रपाल चौकसे?
दरम्यान, विद्यमान आमदार भाजप नेते डॉ. आशिष देशमुख आणि सुनील केदार यांच्यातील राजकीय संघर्ष सुप्रसिद्ध आहे. गेल्या निवडणुकीत देशमुखांनी केदारांना मोठा धक्का दिल्यानंतर आता पुढील निवडणुकीत केदारांना कायमचे कोपऱ्यात करण्यासाठी डॉ. देशमुखांनी कंबर कसली आहे. त्यामुळे सावनेरची ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे.
या सर्व समीकरणांच्या केंद्रस्थानी आहे नगर विकास आघाडी. ती कोणत्या पक्षाबरोबर जाईल, स्वतंत्र लढेल की ‘किंगमेकर’ची भूमिका निभावेल? असे म्हटले जाते की, या आघाडीत संपूर्ण सावनेरचे राजकारण उलथवून टाकण्याची क्षमता आहे. सर्वांचे लक्ष आता लोधींच्या पुढील राजकीय हालचालीकडे लागले आहे.








