Bitter Rivals Unite, Talks of a New Alliance Gain Momentum : देऊळगाव राजात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता
Deulgao Raja शहरातील नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता तापू लागली आहे. हिवाळ्याच्या थंड वातावरणातही राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, विधानसभेत आमनेसामने लढलेले दोन नेते आता एकाच टेबलावर बसल्याने चर्चांना उधाण आले आहे. नगरविकासासाठी ‘नव्या आघाडी’ची शक्यता व्यक्त होत असून, या हालचालींमुळे शहरातील राजकीय समीकरणच बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिंदे गटाच्या हालचालींनी महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. गुप्त बैठका सुरू असल्याची माहिती समोर आली असून, या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर संतुलन ढवळून निघत आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या अलीकडील भेटीगाठींनी ‘नगरविकास आघाडी’ स्थापन होण्याच्या चर्चांना अधिकच वेग मिळाला आहे. दोन्ही नेत्यांमधील सामंजस्यामुळे शहरातील सत्तेचे गणितच बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mahayuti Government : ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाला ‘लोगो’!
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि उबाठा गट यांच्यात ‘कोण कोणासोबत?’ हे समीकरण अद्याप स्पष्ट नसले तरी प्रत्येक गट स्वतःची ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. या घडामोडींमुळे विरोधकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी मात्र अद्याप गोंधळात असून उमेदवार निश्चित करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांना ठोस आव्हान नसल्याने आगामी निवडणुकीत थेट बहुकोनी लढत अपेक्षित आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, “विधानसभेत आमनेसामने, पण नगरपरिषदेच्या रणांगणात खांद्याला खांदा लावून” हे समीकरण देऊळगाव राजाच्या सत्तेचा चेहराच बदलू शकते. शहरातील गल्लीबोळांत सध्या एकच चर्चा — ‘गुप्त बैठकीचं राजकारण कुणाच्या बाजूने झुकणार?’ आणि ‘खऱ्या सत्तेचा राजा कोण ठरणार?’
थंड हवामान असूनही देऊळगाव राजाचं राजकारण तापमान ओलांडून पेटलं आहे. येत्या काही दिवसांत ‘नगरविकास आघाडी’चे अधिकृत रूप स्पष्ट झाल्यास शहरात सत्तेचे नवेनवे समीकरण निर्माण होणार आहे. मात्र, अंतिम निर्णय मतदारांच्या हातात असून आता ‘योग्य पर्याय’ निवडण्याची वेळ त्यांच्या दारी येऊन ठेपली आहे.








