BJP’s ‘young card’ for local elections : दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी
Akola राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठी हालचाल केली आहे. याअंतर्गत जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीत मोठे बदल करत पक्षाने दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली आहे. यावेळी आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला असला, तरी त्यांच्या शिफारशींनाच अंतिम मान्यता देण्यात आल्याचे चित्र आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या यादीनुसार राज्यातील ७८ पैकी ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या धोरणानुसार ५५ वर्षांखालील, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि पक्षाशी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नवोदित आणि तरुण चेहऱ्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी हे पद प्रामुख्याने आमदार, खासदार किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे असायचे. मात्र ही परंपरा मोडीत काढत पक्षाने नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
भाजपकडून दरवर्षी विविध संघटनात्मक उपक्रम राबवले जातात. त्यासाठी पूर्णवेळ देऊ शकणारे, उत्साही आणि कार्यक्षम नेतृत्व आवश्यक असल्याने ही नियुक्ती प्रक्रिया राबवण्यात आली. तथापि, काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक आमदारांनी दबाव टाकत आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षपदी संधी मिळवून दिल्याचेही स्पष्ट होते. बहुतेक ठिकाणी ही निवड स्थानिक आमदारांच्या शिफारशीवर आधारित असल्याचे जाणवते.
Eknath Shinde Shiv Sena : शिवसेना शिंदे गटात फेरबदलांनंतर खदखद
दरम्यान, राज्यात दोन ठिकाणी अपवाद नोंदवले गेले. जालना जिल्ह्यात आमदार नारायण कुचे तर सातारा जिल्ह्यात आमदार डॉ. अतुल भोसले यांची जिल्हाध्यक्षपदी थेट नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना दिलेला हा संधीचा प्रयोग आगामी निवडणुकांत यशस्वी ठरतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.