Local Body Elections : भीलगाव सर्कलमध्ये काँग्रेस – भाजप आमने – सामने !

Congress – BJP face to face in Bhilgaon circle : महिला राखीव झाल्यानं नव्या चेहऱ्यांना संधी, स्थानिक गटबाजी ठरणार निर्णायक

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सर्कलपैकी भीलगाव सर्कलमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजप आमने-सामने येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा सर्कल आता भाजपच्या प्रभावाखाली आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत भाजपचे मोहन माकडे यांनी १३८ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाची लढत किती चुरशीची आणि रणनितीप्रधान असेल, याची राजकीय वर्तुळाच उत्सुकता निर्माण झाली आहे.

यावेळी भीलगाव सर्कल महिला राखीव झाल्याने परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. या आरक्षणामुळे जुन्या राजकीय खेळाडुंना बाजुला व्हावे लागणार आहे. आता नव्या महिला चेहऱ्यांना उमेदवारीची दारे खुली झाली आहेत. मात्र भीलगाव परिसरातील गटबाजी, नातेवाईकी आणि राजकीय गटांचे अंतर्गत मतभेद हे समीकरण अधिक गुंतागुंतीचे बनवणार आहेत. भाजपने यावेळी लवकरच प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे. पक्षाकडून उमेदवारीसाठी कामठी पंचायत समितीचे माजी सभापती उमेश रडके यांच्या पत्नी करूणा रडके, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांच्या परिवारातील महिला, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष लतेश्र्वरी ब्रम्हा काळे आणि स्वाती पंकज साबळे ही नावे चर्चेत आहेत.

Municipal Corporation : गडकरींच्या फटकारणीनंतर मनपाची धावपळ, आयुक्तांनी कचरा कंपन्यांना दौडवले !

भाजपकडून चर्चेत असलेल्या चारही उमेदवारांची स्थानिक पातळीवर बऱ्यापैकी पकड आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी संघटनात्मक दृष्ट्या सक्रीय भूमिका बजावली आहे. मोहन माकडे यांचा विकासाचा मुद्दा पुन्हा पुढे करून मतदारांना विश्र्वासात घेणे, रस्ते, पाणी पुरवठा स्थानिक बाजारपेठेतील सुधारणा हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील, अशी शक्यता आहे. तसेच पक्षाच्या उच्च पातळीवर समन्वय समितीने महिला उमेदवाराला संघटनेची पूर्ण ताकद देण्याची तयारी दर्शवली आहे.

काँग्रेसची रणनिती काय ?
काँग्रेसने अद्याप उमेदवाचे नाव घोषीत केलेले नाही. सद्यस्थितीत ज्योती रमेश झोड, योगिता किशोर दांडे, आणि श्र्वेता तुषार रडके ही नावे चर्चेत आहेत. या तिघींपैकी प्रत्येकीचे स्वतःच्या मतदारसंघात एक प्रभावक्षेत्र आहे. विशेषतः ज्योती झोड या स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी दीर्घकाळापासून जोडलेल्या आहेत. योगिता दांडे या नंतर राजकारणात आल्या आहेत. मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा सकारात्मक आहे. पारंपरिक मतदार आणि सामाजिक समतेचा मुद्दा हा काँग्रेसचा मुख्य आधार राहिलेला आहे. मात्र मागील निवडणुकीतील अल्प फरकाने झालेला पराभव अजूनही कार्यकर्त्यांना बोचतो आहे. त्यामुळे यंदा काँग्रेससाठी केवळ संघटन नव्हे, तर ‘एकीचे बळ’ या विजयाचा सर्वात मोठा घटक ठरणार आहे.

Doctor suicide case in Phaltan : मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टरही संपावर, ओपीडीसमोर लांबच लांब रांगा !

स्थानिक गटबाजी आणि सामाजिक समीकरणे..
भीलगाव सर्कलमध्ये जातीय, सामाजिक आणि वैयक्तिक संबंधांचे राजकारण नेहमीच ठळक राहिलेले आहे. यंदाही हे समीकरण निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्कल महिला राखीव झाल्याने पुरूष नेत्यांच्या गटबाजीचा परिणाम उमेदवारांच्या प्रचारावर पडणार आहे. भीलगाव सर्कलची निवडणूक ही फक्त सर्कलपुरती मर्यादित न राहता भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या प्रतिष्ठेची लढत असणार आहे. एका बाजुला भाजपकडे संघटनेची ताकद, विकासाचे दावे, गडकरी, फडणवीसांचे पाठबळ तर दुसरीकडे काँग्रेसकडे माजी मंत्री सुनील केदार यांची रणनिती, स्थानिक जनाधार, जुना विश्र्वास आणि गटांमधील तडजोडींची शक्यता आहे. या परिस्थितीत भीलगाव सर्कलचा ताज कुणाच्या डोक्यावर चढतो, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.