Congress leader Ranjit Kamble criticizes his own party leaders : आतातरी काँग्रेस नेत्यांनी एकदिलाने निवडणुकीला सामोरे जावे
Nagpur : काँग्रेस म्हणजे एके काळचा बलाढ्य पक्ष. या पक्षाची उमेदवारी मिळाली की माणूस आमदार, खासदार झालाच समजा. विरोधासाठी कुणीतही पाहिजे म्हणून काही जागा स्वतःहून सोडून द्यायच्या, हा पक्षाचा एके काळचा तोरा. पण काँग्रेसमधील काही नेत्याच्या राजेशाही थाटामुळे हळूहळू हा पक्ष लयास जात गेला. आज काँग्रेसला स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी धडपड करण्याची वेळ आली आहे.
शिस्तबद्धता हा गुण अंगी बाळगल्यामुळे भारतीय जनता पक्ष हळूहळू पुढे येत गेला अन् आज जगातील सर्वात मोठा पक्ष झालेला आहे आणि या पक्षाच्या विरोधात आता काँग्रेसला लढायचे आहे. पण या पक्षाची तयारी काहीच नाही, हे सांगणारा एक प्रसंग नुकताच नागपुरात घडला. काँग्रेस नेते माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे काँग्रेसचे निरीक्षक रणजित कांबळे यांनी उणिवा दाखवल्या. गटबाजी सोडा, एकमेकांची उणीदुणी काढू नका, जे झाले ते विसरून जा, असे सांगत त्यांनीच काँग्रेसमध्ये अजुनही गटबाजी कशी आहे, हे उजागर केले.
रणजित कांबळे यांचे म्हणणे रास्तच आहे. कारण असे म्हटले जाते की, काँग्रेसला कुणीही पराभूत करू शकत नाही. पराभूत करू शकते ती फक्त काँग्रेसच. कारण या पक्षातील नेते एकमेकांचे पाय खेचून पराभव ओढवून घेतात. सर्व नेते एकत्र राहिले तर काय होते, हे नागपूर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वांनीच पाहिले. पण अजूनही काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी संपलेली नाही, हेच रणजित कांबळे यांनी अधोरेखीत केले.
ईव्हीएमचा दोष नाही..
ईव्हीएममध्ये येवढा मोठा घोटाळा होऊ शकत नाही. संपूर्ण देशभर ईव्हीएम मॅनेज करणे शक्य नाही. त्यामुळे ही कारणे सोडा आणि स्वतःतील दोष शोधा. मीसुद्धा पराभूत झालो. पण मी कुठेतरी कमी पडलो म्हणून पराभूत झालो, हे मी कबूल करतो. तुम्हीही कबूल करा. स्वतःच्या समाधानासाठी ईव्हीएमला दोष देऊ नका, असे म्हणत रणजित कांबळे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना घरचा अहेर दिला आहे. आता तरी नेत्यांनी एकदिलाने काम करावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.