Fierce Competition for BJP Tickets in Chikhli : काँग्रेस ‘वेट अँड वॉच’मध्ये; राजकीय तापमान वाढले
Chikhali जिल्ह्याची राजकीय राजधानी मानल्या जाणाऱ्या चिखली शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वच पक्षांत उमेदवारी मिळवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मात्र सध्या भाजपात तिकिटासाठीची स्पर्धा चुरशीला पोहोचली असून, पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची शर्यत इतकी तीव्र झाली आहे की, कार्यकर्त्यांनी एकमेकांना नामोहरम करण्याची तयारी ठेवली आहे. तिकिट मिळवण्यासाठी काही कार्यकर्ते आपापली गटबांधणी मजबूत करत असून, अंतर्गत राजकीय ‘खेळ’ रंगू लागले आहेत.
Local Body Elections : आम आदमी पार्टीचा उमेदवार ठरला, निवडणुकीसाठी थोपटले दंड!
नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी भाजपने या वेळी अनोखी पद्धत अवलंबली आहे. उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान प्रत्येक इच्छुकाला ‘आपण नगराध्यक्ष झाल्यास कोणते तीन नेते आपले मार्गदर्शक असावेत’ अशी विचारणा करून त्यांची नावे लिहून घेण्यात आली आहेत. या प्रक्रियेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांत मोठी चर्चा रंगली असून, अंतिम उमेदवार कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गतवेळी बाहेरून उमेदवार आणल्याने असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे या वेळी निष्ठावान स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा भाजपच्या तळागाळात व्यक्त होत आहे.
भाजपातील गटबाजी आणि अंतर्गत संघर्ष पाहता काँग्रेसने सध्या शांत धोरण अवलंबले असून, योग्य वेळ साधून भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना आपल्या गोटात खेचण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपविरुद्ध एकत्रित विरोधी आघाडी निर्माण होण्याचीही चिन्हे दिसत आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पातळीवरही राजकीय स्पर्धा खालच्या पातळीवर गेली आहे. काही कार्यकर्त्यांनी स्वतःला ‘नेते’ म्हणून घोषित करत, सोशल मीडियावर आणि फलकबाजीद्वारे शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. काही ठिकाणी वैमनस्यातून जाहिरातीचे फलक फाडणे, अफवा पसरवणे असे प्रकारही समोर आले आहेत. जुन्या कार्यकर्त्यांत यामुळे नाराजी पसरली आहे.
Local Body Elections : ३५ हरकती मंजूर, ९ अर्ज अमान्य; ३१ ऑक्टोबरला अंतिम यादी
एकीकडे भाजपमध्ये अंतर्गत कलह तर दुसरीकडे काँग्रेसची संयमी पण योजनाबद्ध तयारी — त्यामुळे चिखली नगरपरिषदेची निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची, संघर्षपूर्ण आणि चर्चेची ठरण्याची पूर्ण शक्यता आहे.








