Local Body Elections : सिंदखेडराजा नगर परिषदेत ‘मेहेत्रे पॅटर्न’चा दबदबा!

Five candidates with the surname ‘Mehetre’ elected : वेगवेगळ्या पक्षांतून एकाच वेळी पाच मेहेत्रे शिलेदार विजयी

Sindkhedraja नुकत्याच पार पडलेल्या सिंदखेडराजा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहराच्या राजकारणात एक वेगळाच योग जुळून आला आहे. विविध राजकीय पक्षांतून निवडणूक लढवणाऱ्या ‘मेहेत्रे’ आडनावाच्या तब्बल पाच उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत सभागृहात आपला ठसा उमटवला आहे. पक्ष कोणताही असो; मात्र मतदारांनी ‘मेहेत्रे’ नावावर विश्वास टाकत भरभरून कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

नगर परिषद सभागृहात आता पाच ‘मेहेत्रे’ नगरसेवकांचा प्रभावी आवाज घुमणार असून, शहरात “सत्ता कोणाचीही असो, दबदबा मात्र मेहेत्रेचाच!” अशी चर्चा रंगू लागली आहे.

Zilla Parishad Elections : सिंदखेडराजात ‘काका–पुतणे’ पुन्हा आमनेसामने

अॅड. संदीप मेहेत्रेंचा विक्रमी विजय

सामाजिक क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून सक्रिय, ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे अॅड. संदीप सखाराम मेहेत्रे (प्रभाग क्र. १०-ब) यांनी या निवडणुकीत मेहेत्रे गटात सर्वाधिक मते मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळवला.
पक्ष : शिवसेना
मिळालेली मते : ७०४
विजयाचे मताधिक्य : १९६

कैलास मेहेत्रेंनी शिवसेनेचा भगवा उंचावला

शेतकरी प्रश्नांसाठी आणि नगरपरिषदेतील विविध समस्यांवर सातत्याने आंदोलन करणारे कैलास नारायण मेहेत्रे (प्रभाग क्र. २-अ) यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढत प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली.
पक्ष : शिवसेना
मिळालेली मते : ५५२
विजयाचे मताधिक्य : ५५

सोनाली मेहेत्रेंना महिलांचा भरघोस पाठिंबा

शेतकरी कुटुंबातील आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या सौ. सोनाली गजानन मेहेत्रे (प्रभाग क्र. २-ब, महिला राखीव) यांनी तुतारी फुंकत दणदणीत विजय मिळवला.
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)
मिळालेली मते : ५२२
विजयाचे मताधिक्य : ५५

‘बल्लीभाई’ संतोष मेहेत्रेंची अटीतटीची बाजी

सामाजिक कार्याचा अनुभव आणि आईच्या उपनगराध्यक्षपदाचा वारसा पाठीशी असलेले, ‘बल्लीभाई’ म्हणून ओळखले जाणारे संतोष प्रकाश मेहेत्रे (प्रभाग क्र. १-ब) यांनी अटीतटीच्या लढतीत भाजपचा झेंडा फडकवत विजय मिळवला.
पक्ष : भारतीय जनता पार्टी
मिळालेली मते : ४६५
विजयाचे मताधिक्य : २२

कृष्णा मेहेत्रेंचा युवकशक्तीवर विजय

अत्यंत गरीब कुटुंबातील तरुण युवक कृष्णा माणिक मेहेत्रे (प्रभाग क्र. ८-ब) यांनी पहिल्याच निवडणुकीत तरुणांची फौज उभारत भाजप उमेदवाराचा पराभव केला.
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)
मिळालेली मते : ३७९
विजयाचे मताधिक्य : ७८

Food and Drugs Department : निकृष्ट रेशन धान्यावर संताप; वाटप रोखून ३९४ क्विंटल ज्वारी परत

वेगवेगळे पक्ष, एकच दबदबा

विशेष म्हणजे हे पाचही नगरसेवक वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधित्व करतात. यात

शिवसेना – २

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) – २

भाजप – १

असा राजकीय समतोल आहे. शहराच्या विकासात हे पाचही ‘मेहेत्रे’ नगरसेवक कोणती भूमिका बजावतात, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, सिंदखेडराजा राजकारणात ‘मेहेत्रे पॅटर्न’ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.