Instructions to submit statistics on SC and ST population : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढणार
Amravati आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी पत्र पाठवून अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि एकूण लोकसंख्येची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि १४ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी लॉटरी (सोडत) काढण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित प्रवर्गांची लोकसंख्या आणि त्यांचे टक्केवारीनुसार आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
Uddhav Thackeray group : ठाकरे गटाचे पदाधिकारी बदलले, नशीब बदलणार का?
दरम्यान, जिल्हा निवडणूक विभागाने मागणीनुसार लोकसंख्येची माहिती ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार अमरावती जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १८,०४,५१४ आहे. यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ३,३८,९०४ (१८.७८%), तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३,६०,३९० (१९.९७%) आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या मागील ५९ सदस्यांच्या जागा आणि पंचायत समित्यांच्या ११८ प्रभागांसाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी गट व गणांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम शासनाने याआधीच जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादीला फायदा होणार?
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, राजकीय मंडळीही सक्रिय झाली आहेत. अध्यक्ष आणि सभापती पदांसह गट-गणाच्या आरक्षणाबाबत कोणत्या प्रवर्गाला संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे यंदाची आरक्षण सोडत कोणाच्या पारड्यात जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.