Mayor lands in trouble due to lack of majority : शेगाव–मेहकर–लोणारमध्ये सत्तासमीकरणे ढवळली, लहान पक्षांचे महत्त्व वाढले
Buldhana जिल्ह्यातील शेगाव, मेहकर आणि लोणार या तीन नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचे निवडून आले असले, तरी सभागृहात बहुमत दुसऱ्याच पक्षाकडे असल्याने सत्तास्थापनेसह दैनंदिन निर्णयप्रक्रिया नगराध्यक्षांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. परिणामी उपाध्यक्ष व विषय समिती सभापतीपदांसाठी राजकीय वाटाघाटींना वेग आला असून, अपक्ष व लहान पक्षांचे महत्त्व अचानक वाढले आहे.
शेगाव आणि लोणार येथे काँग्रेसचे, तर मेहकर येथे उद्धवसेनेचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले आहेत. मात्र या तिन्ही नगरपालिकांमध्ये संबंधित पक्षांकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता टिकवण्यासाठी इतर पक्ष व अपक्षांची मदत अपरिहार्य ठरणार आहे. विरोधकांनी एकत्रित मोर्चेबांधणी केल्यास उपाध्यक्षपद तसेच विषय समिती सभापतीपदे मिळवण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे.
मेहकर : विरोधक बहुमतात, नगराध्यक्षांसमोर कसोटी
मेहकर नगरपालिकेत उद्धवसेनेचे किशोर गारोळे नगराध्यक्षपदी निवडून आले असून, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र येथे काँग्रेसचे सर्वाधिक ११ नगरसेवक आहेत. शिंदेसेनेचे ९ तर उद्धवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. एकूण संख्याबळ पाहता विरोधकांकडे बहुमत असल्याने नगराध्यक्षांना प्रत्येक निर्णयासाठी तडजोडीचे राजकारण करावे लागणार आहे.
Zilla Parishad Elections : सिंदखेडराजात ‘काका–पुतणे’ पुन्हा आमनेसामने
शेगाव : काँग्रेस नगराध्यक्षांची ‘अग्निपरीक्षा’
शेगाव नगरपालिकेत काँग्रेसचे प्रकाश शेगोकार नगराध्यक्ष झाले असले, तरी काँग्रेसचे केवळ ५ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे तब्बल १५ नगरसेवक असून, शिंदेसेना २, एमआयएम ४, वंचित बहुजन आघाडी २, उद्धवसेना व अपक्ष प्रत्येकी १ नगरसेवक आहेत. येथे सत्तासमीकरणे पूर्णपणे भाजपकेंद्रित असल्याने काँग्रेस नगराध्यक्षांसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
लोणार : अपक्षांवर सत्तेची चावी
लोणारमध्ये काँग्रेसच्या मीरा मापारी नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. काँग्रेसचे ८ नगरसेवक, शिंदेसेनेचे ५, अपक्ष ५, तर भाजप व एमआयएमचा प्रत्येकी १ नगरसेवक आहे. येथे सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असून, कोणत्या बाजूने अपक्ष झुकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना मताधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याने संख्याबळ एकने वाढले असले, तरी शेगाव, मेहकर व लोणारमध्ये तरीही नगराध्यक्षांच्या पक्षांकडे बहुमत अपुरेच राहणार आहे. सभागृहात ठराव मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन चतुर्थांश बहुमतासाठी मविआतील घटक पक्ष, अपक्ष व समविचारी पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी उपाध्यक्षपद व विषय समिती सभापतीपदांची ‘ऑफर’ देत राजकीय वाटाघाटी होण्याची शक्यता आहे.
Food and Drugs Department : निकृष्ट रेशन धान्यावर संताप; वाटप रोखून ३९४ क्विंटल ज्वारी परत
दरम्यान, चिखली नगरपालिकेत भाजपचे पंडितराव देशमुख नगराध्यक्ष झाले असून, येथे भाजप व मविआकडे प्रत्येकी १३ नगरसेवक आहेत. भाजप शिंदेसेना व राष्ट्रवादीची मदत घेऊन सत्ता स्थापन करू शकते.
एकूणच जिल्ह्यातील या राजकीय स्थित्यंतरामुळे उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीत चुरस निर्माण झाली असून, येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.








