Political parties still confused over candidacy; Ward reorganization adds to complexity : सोमवारपासून अर्जांचा ‘हंगामा’ सुरू होण्याची शक्यता; सोशल मीडियावर इच्छुकांची धडपड वाढली
Nagpur : नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागले असले तरी उमेदवारी निश्चित करण्याबाबत राजकीय पक्षांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण कायम असल्याचं दिसत आहे. विशेषतः प्रभागांच्या पुनर्रचनेनंतर नवे राजकीय गणित तयार झाले असून, प्रत्येक पक्ष तिकीट वाटप करताना सावध पावले टाकत आहे. नवे प्रभाग, बदललेले आरक्षण आणि भूगोलात झालेल्या फेरबदलांमुळे जुनी मतपत्रे आणि गणिते निकामी ठरली आहेत.
कोणाला कुठून उमेदवारी द्यायची, कोणाचा प्रभाग बदलायचा, कुणाला वगळायचे, या सर्व प्रश्नांमध्ये पक्ष अडकले आहेत. दरम्यान, उद्या सोमवारी (१७ नोव्हेंबर) उमेदवारांच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया वेग घेणार आहे. निवडणूक कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. इच्छुकांमध्ये ‘मीच नगरसेवक’ असा उत्साह दिसत असून, आपले नाव अंतिम यादीत यावे म्हणून जमेल ते प्रत्येक प्रयत्न सुरू आहेत.
Nationalist Congress : रामटेकमध्ये अजित पवारांची ताकद वाढवणार चंद्रपाल चौकसे?
नव्या प्रभागांतून कोण-कोण उभे राहणार, कोणता पक्ष कोणावर विश्वास ठेवणार आणि कोणाला बाजूला काढले जाणार, याविषयी नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. स्थानिक चर्चा, बैठकांमधील हालचाली, पक्षनेत्यांच्या भेटीगाठी यामुळे राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. याचदरम्यान, सोशल मीडियावर इच्छुकांनी आपली ताकद दाखवण्याची स्पर्धा सुरू केली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप स्टेटस, पोस्टर्स, व्हिडिओ मेसेजेस, बॅनर्स यांच्या माध्यमातून प्रचाराचा सूर जोरात लागला आहे. काहींनी तर स्वतःच्या नावाचे आकर्षक प्रमोशनल व्हिडिओही तयार करून प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.
पक्षांतर्गत चर्चा मात्र अपेक्षित वेगाने सुरू नाही. स्थानिक पातळीवरील गट-तट, संभाव्य बंडखोरीची भीती, पुनर्रचित प्रभागांमुळे तयार झालेली अनिश्चितता, या सर्वांचा पक्षांवर मोठा परिणाम दिसत आहे. अनुभवी नगरसेवकांनाही आपल्या पारंपरिक भागातून तिकीट मिळेल की नाही, याची खात्री राहिलेली नाही. एकंदरीत, पुनर्रचनेनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्ष सावध, इच्छुक उतावीळ आणि मतदार उत्सुक अशा त्रिकोणी वातावरणात स्थानिक निवडणुकीचा ‘क्लायमॅक्स’ आता रंगत चालला आहे.








