Sharad Pawar group preparing to fight on its own : जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीतून मिळाले संकेत
Nagpur : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होण्याचे चित्र वरवर रंगवले जात असले तरी आतून मात्र वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचे दिसून येते. काल (ता. ३ जून) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक गणेशपेठ येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत स्वबळाची तयारी करण्याचा संदेश अप्रत्यक्षपणे विदर्भाचे प्रभारी आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर पंचायत या निवडणुकांच्या दृष्टीने तालुकानिहाय बैठकांचे आयोजन प्रत्येक गटात आणि गणात करावे. पक्ष बांधणी आणि बैठका व कार्यक्रमाची आखणी करावी. लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे महाविकास आघाडीत एकत्र आणि एकजूट दाखवत या निवडणुका लढण्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी मित्र पक्षांशी स्थानिक आणि प्रदेश पातळीवर संपर्क साधून करण्याच्या बाबतीत चर्चा करावी, असे बैठकीत ठरवण्यात आले.
आघाडी राहो अथवा न राहो, पण सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर सर्वच्या सर्व जागांवर लढ्याची तयारी करण्याच्या सुचना देण्यात आल्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीला माजी आमदार विजय घोडमारे, प्रकाश गजभिये, सलील देशमुख, कार्याध्यक्ष किशोर बेलसरे, प्रदेश पदाधिकारी शेखर कोल्हे, विनोद हरडे, अविनाश गोतमारे, सुरेश गुडधे, प्रेम झाडे, जिल्हा महिला अध्यक्ष डॉ. वैशाली टालाटुले, प्रदेश महिला सरचिटणीस बबिता सोमकुंवर, युवती जिल्हाध्यक्ष रश्मी आरघोडे, अनिता दरने, सेवादल अध्यक्ष योगेश धनुस्कर आदी उपस्थित होते.