Local Body Elections : सिंदखेड राजा नगर परिषद निवडणूक ठरली ‘संघर्षाची लढाई’

Social harmony strained, future politics to feel the impact : अंतर्गत कलह उफाळला; सामाजिक सलोख्याला तडे, भविष्यातील राजकारणावर पडणार परिणाम

Sindkhed raja सिंदखेडराजा नगरपरिषद स्थापन झाल्यापासून प्रथमच नगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने ही निवडणूक केवळ सत्तासंघर्षापुरती न राहता अंतर्गत संघर्षाची लढाई ठरल्याचे चित्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे राहिल्याने जाती-जातींमध्ये, नात्या-गोत्यांमध्ये अंतर्गत कलह वाढला असून शहरात घुसपुस, वादावादी सुरू झाली आहे.

निवडणूक कोणतीही असो, मतदार आणि कार्यकर्ता भविष्यात अनेक वर्षे उमेदवाराने दिलेली वागणूक लक्षात ठेवतो. प्रचारादरम्यान उमेदवार कसा वागला, कार्यकर्त्यांना कसे वागवले, याचा थेट परिणाम पुढील निवडणुकांवर होत असतो. सध्या सिंदखेड राजा शहरात नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र निकाल जाहीर होण्यापूर्वीच शहरातील अनेक भागांत अंतर्गत वाद उफाळल्याने सामाजिक सलोख्याला धोका निर्माण झाला आहे.

Landless launch agitation : भूमिहीनांचा एल्गार, खामगाव एसडीओ कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’

२१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असताना काही उमेदवारांची आक्रमक भूमिका, कार्यकर्त्यांशी असलेले ताणलेले संबंध आणि प्रचारातील कटुता याचे दीर्घकालीन राजकीय परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२५ च्या या नगरपरिषद निवडणुकीत घडलेल्या राजकीय उलथापालथींमधून धडा घेतला नाही, तर याचे पडसाद २०२९ आणि त्यानंतरच्या निवडणुकांवरही उमटू शकतात, असा इशारा जाणकारांकडून दिला जात आहे.

दरम्यान, शहरात शांतता राखणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे. विजय-पराजयानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रमुख, उमेदवार व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयमाचे आदेश देणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा निवडणुकीनंतरचा असंतोष रस्त्यावर उतरण्याची भीती व्यक्त होत आहे.

Landless launch agitation : भूमिहीनांचा एल्गार, खामगाव एसडीओ कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’

राजकारणात तात्कालिक फायदा मिळवण्यासाठी केलेली वागणूक भविष्यात महागात पडू शकते. पाच वर्ष शांत असलेला मतदार किंवा कार्यकर्ता एखाद्या निवडणुकीत आपला हिशेब चुकता करतो, हे वास्तव लक्षात घेऊन उमेदवारांनी संयम, सौजन्य आणि सकारात्मक वर्तन ठेवणे गरजेचे असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.