The decision regarding the elections will be taken by the senior leaders of Mahayuti : एकत्र लढण्याबाबत अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या नेत्याने स्पष्ट सांगितले
Khamgao आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्रितपणे लढणार की स्वतंत्र चूल मांडणार, याबाबत अद्याप स्थानिक पातळीवर मोठा संभ्रम आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते जे ठरवणार, त्यानुसार काम होणार असे दिसत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे नेते संजय खोडके यांनी देखील हा निर्णय तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते करतील, असे स्पष्टच सांगितले आहे.
खामगाव येथे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश नियोजन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, प्रदेश उपाध्यक्ष टी.डी. अंभोरे, प्रदेश सचिव गिरधर पाटील, देवेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार म्हणतात, ‘कर्जमाफीची घोषणा फडणविसांची, आमची नाही’
या वेळी खोडके म्हणाले, “माजी आमदार सानंदा यांनी ४० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केले असून, त्यांची कार्यक्षमता, अनुभव आणि प्रभाव लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान दिले जाईल.” त्यांनी स्पष्ट केले की, सानंदा यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद संपूर्ण जिल्ह्यात वाढेल, तसेच काही अन्य नेतेही लवकरच पक्षात दाखल होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीटवाटपासारखे काही निर्णय स्थानिक पातळीवरच घेतले जातील. प्रत्येक पक्षाची काही ताकद आणि अपेक्षा असतात, त्यामुळे मतभेद संभवतातच; मात्र त्यावर सामोपचाराने तोडगा निघेल, असेही खोडके म्हणाले.
“मी भारतीय काँग्रेसमध्ये फुले-शाहू-आंबेडकर-आझाद यांच्या विचारधारेवर काम केले. आता त्या विचारधारेचेच प्रतिबिंब असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार आहे. फक्त नावात थोडा फरक आहे,” असे सानंदा म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, कार्यकर्त्यांना पुढे आणायचे आहे आणि अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्यासाठी सर्वस्व झोकून द्यायचे आहे.
Corona : स्वाईन फ्ल्यूला पोषक वातावरण, आरोग्य विभागाची चिंता वाढली !
जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी पक्ष बळकटीसाठी केलेल्या आवाहनानंतर राजकीय हालचालींना गती मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर सानंदा यांचा प्रवेश ठरल्याचे बोलले जात आहे. प्रवेश सोहळ्याच्या दिवशी मित्रपक्षातील कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनाही निमंत्रण देण्यात येईल, तसेच भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी पुष्पवृष्टी केली जाईल, अशी माहितीही सानंदा यांनी दिली.








