Vanchit Bahujan Aghadi leader worked for the Congress; suspended from the party : दीपक बोडके ‘वंचित’मधून सहा वर्षांसाठी निलंबित
Akot अकोट नगरपरिषद निवडणुकीत पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवून वंचित बहुजन आघाडीने अकोट येथील पक्षाचे नेते दीपक बोडखे यांच्यावर कारवाई केली आहे. पक्षशिस्तीचा भंग झाल्याचे कारण देत त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेशपत्र वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी जारी केले. दीपक बोडके यांचे मोठे भाऊ संजय बोडखे यांच्या पत्नी काँग्रेसकडून अकोट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी दीपक बोडखे यांनी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांचे पूत्र आहेत.
पक्षाने नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली असताना दीपक बोडखे यांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या कृतीमुळे पक्षाचे नुकसान झाले असून, संघटनशिस्त भंग झाल्याचे प्रदेश नेतृत्वाने पत्रात नमूद केले आहे. स्थानिक पातळीवरील अहवालांचा अभ्यास करूनच ही कारवाई करण्यात आल्याचेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Local Body Elections : पश्चिम विदर्भातील या नगरपालिकांमध्ये २० डिसेंबरला मतदान
दीपक बोडखे हे मागील विधानसभा निवडणुकीत अकोट विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी पक्षासाठी प्रचार करत निवडणूक लढविली होती; मात्र अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी कृती केल्याचे पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे. याबाबत अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर पक्षाने गोपनीय चौकशी केली व त्यातून बोडखे यांच्या विरोधात निष्कर्ष लागल्याचे कळते.
पक्ष नेतृत्वाने जारी केलेल्या पत्रानुसार, “दीपक बोडखे यांनी अधिकृत उमेदवाराविरोधात काम करीत पक्षाची प्रतिमा धुळिस मिळवली असून, अशा प्रकारच्या कृतींना पक्षात स्थान नाही.” पुढील सहा वर्षे कोणत्याही संघटनात्मक कामकाजात त्यांना सहभागी होता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
Municipal election 2025 : सत्ताधाऱ्यांचा यावर अभिमान वाटत असेल तर लोकशाहीचं नुकसान !
वंचित बहुजन आघाडी अलीकडील काळात स्थानिक पातळीवर आपले संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे. अशा परिस्थितीत पक्षशिस्त भंगासंदर्भातील कारवाया विशेष महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या कारवाईमुळे अकोट तालुक्यातील वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. काही कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या निर्णयाचे समर्थन केले जात असताना काही जण या कारवाईला अतिशय कठोर असल्याचे मत व्यक्त करत आहेत.
पक्षांकडून शिस्तभंग प्रकरणांवर होणारी ही निर्णायक कारवाई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.








