Amravati Municipal Elections Likely to Be Held in January : जिल्हा परिषद, नगरपंचायतसाठी नोव्हेंबरमध्ये आचारसंहितेची शक्यता; महापौर पदाच्या आरक्षणाकडे लक्ष
Amravati अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिका प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू केली असून, सध्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू आहे.
याअनुषंगाने १५ जानेवारीपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यात येण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेने निवडणुकीसाठी २२ प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली आहे. आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांच्या सूचनेनुसार झोननिहाय अधिकारी-कर्मचारी पथके नेमण्यात आली असून, सहायक आयुक्तांना झोन प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
Vasudha Deshmukh : माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा अन् सोशल मीडियावर खळबळ!
२०१७ च्या विधानसभा मतदार याद्यांच्या आधारे प्रभागनिहाय विभाजनाचे काम सुरू असून, ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आयोगाच्या संकेतस्थळावर मतदार याद्या अपलोड केल्या जाणार आहेत.
एकंदरीत तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपंचायत पातळीवर इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळीनंतर मतदारांशी संपर्क, भेटीगाठींचा सिलसिला वाढल्याचे चित्र आहे.
महापालिकेतील महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहते, यावर राजकीय समीकरणे अवलंबून असतील. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच पक्षांतील महत्त्वाच्या हालचालींना वेग येईल, असे मानले जात आहे.
Tribal leaders unite : मंत्र्यांसह आदिवासी नेते एकवटले तीव्र आंदोलनाचा इशारा
सध्या भाजप, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये महापौर पदासाठी अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत आहेत. अनेक इच्छुकांनी भेटीगाठींना आणि जनसंपर्क उपक्रमांना गती दिली असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेच्या राजकारणात ‘महिला राज’ असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Local Body Elections : मतदार याद्यांतील गोंधळावर शिक्कामोर्तब!
आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या सौभाग्यवतींना पुढे करण्याची रणनीती आखली आहे. काही दिग्गज महिला नेत्यांनी देखील अध्यक्षपदासाठी पक्ष नेतृत्वाकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. शहरातील होर्डिंग्ज आणि पोस्टरवरून या राजकीय हालचाली प्रकर्षाने दिसून येत आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची आचारसंहिता नोव्हेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता असल्याने सर्व पक्षांनी तयारीस सुरुवात केली आहे.








