Appeal for votes for the BJP in the stronghold of the Shinde Sena : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सभा; काँग्रेसवरही जोरदार टीका
Mehkar शिंदेसेना आणि काँग्रेसचे पारंपरिक बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या मेहकर आणि लोणार नगरपालिका क्षेत्रांमध्ये भाजप यंदा पहिल्यांदाच स्वबळावर रिंगणात उतरला आहे. शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारसभा घेत उमेदवारांसाठी मतांचा जोगवा मागितला. त्यांच्या सभेमुळे दोन्ही नगरपालिकांतील निवडणुकीचे वातावरण आणखी तापले आहे.
गेल्या अनेक निवडणुकांत युतीधर्म पाळत सहकार्याची भूमिका निभावणाऱ्या भाजपने यावेळी दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीत संपूर्ण ताकद झोकून देण्याचा निर्धार केला आहे. “आता भाजपला बळ द्या; आपल्या शहरात बदल घडवा,” असे आवाहन चव्हाण यांनी सभेतून केले. यापूर्वी भडगावातील कार्यक्रमात त्यांनी केलेल्या “दोन डिसेंबरनंतर राजकीय भूकंप” या वक्तव्याची जोरदार चर्चा झाल्याने मेहकर येथील सभेकडे विशेष लक्ष लागले होते.
मेहकर येथील स्वातंत्र्य मैदानावर झालेल्या सभेस जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, आमदार डॉ. श्वेता महाले, प्रकाश गवई, दत्ता पाटील, डॉ. संजय लोहिया, डॉ. बी. एस. झवर, डॉ. पंजाबराव शेजोळ, वंदना दीक्षित, अर्चना पांडे, नारायण राठोड, केशवराव जोशी, विजय पवार यांसह मेहकर-लोणारमधील सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही युतीधर्म पाळत सहकार्य केले. पण यावेळी भाजप स्वबळाची चाचणी घेत आहे. मेहकर-लोणारचा सर्वांगीण विकास हवा असेल तर भाजपला शक्ती द्या. चुकीच्या लोकांवर बराच वर्षांचा विश्वास ठेवलात; आता बदलाची वेळ आली आहे.”
स्वच्छ शहर, उत्तम रस्ते, मुबलक पाणीपुरवठा आणि आधुनिक मलनिस्सारण व्यवस्था अशी आश्वासने देत त्यांनी मेहकरमध्ये सारंग माळेकर आणि लोणारमध्ये पार्वतीबाई इरतकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. “नवे-जुने कार्यकर्त्यांच्या संगमातून परिवर्तन शक्य आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून परिसराचा विकास करण्यास प्राधान्य देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सभेत चव्हाण यांनी काँग्रेस आणि शिंदेसेनेवर जोरदार टीका केली. “गरीबी हटाओचा नारा काँग्रेसने दिला, पण गरीब हटवली ती मोदी सरकारने,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मेहकरला अद्याप समृद्धी महामार्गाचा लाभ पूर्णपणे मिळालेला नाही, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या समस्या कायम असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
पालिका सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले, “मेहकरच्या विकासाची स्वप्ने बाजूला ठेवून शहराला भकास करण्याचे पाप विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून झाले. राजकारणासाठी जनतेचा विश्वासघात केला गेला.”
Self-Reliance Pulses Mission : केंद्र सरकारचे ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान महाराष्ट्रात
पालिका निवडणुकीदरम्यान भाजपकडून घेण्यात आलेल्या सभांपैकी ही दुसरी मोठी सभा ठरली आहे. यापूर्वी चिखलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली असून, रविवारी बुलढाण्यात आणखी एक सभा होणार आहे.








