Local Body Elections : अमरावती जिल्ह्यात मतदार याद्यांवर १३ हजारांहून अधिक हरकती

More Than 13,000 Objections Filed Against Voter Lists : मोर्शी नगरपालिकेत सर्वाधिक ३,१३४ आक्षेप; चिखलदऱ्यात सर्वात कमी ८०

Amravati जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल १३ हजारांहून अधिक आक्षेप दाखल झाले आहेत. या मोठ्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, अंतिम मतदार यादी तयार करणे हे आव्हानात्मक ठरणार आहे.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या याद्यांवर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. मात्र, हरकतींची संख्या वाढत असल्याने निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली होती, जी शुक्रवारी संपली. या कालावधीत जिल्ह्यात एकूण १३ हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या.

Namaz at Shaniwarwada : शनिवार वाडा शुद्धीकरण मोहिमेमुळे महायुतीत फूट !

मोर्शी नगरपालिकेबाबत सर्वाधिक ३,१३४ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. त्याखालोखाल वरुड नगरपालिकेच्या यादीवर २,०३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या यादीवर १,७०७, चांदूर बाजार नगरपालिकेबाबत १,२५० तक्रारी, अंजनगाव सुर्जीकरिता १,१८७, चांदूर रेल्वेसाठी १,०५९, धारणी नगरपंचायतीसाठी ८८२, अचलपूरसाठी ७६१, दर्यापूरसाठी ४११, शेंदुरजनाघाटसाठी ३९६, तर चिखलदरा नगरपरिषदेच्या मतदार यादीवर केवळ ८० हरकती नोंदल्या गेल्या आहेत.

या सर्व हरकतींची पडताळणी करून जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुनावणी घेतली जाणार असून, त्यानंतर सुधारित मतदार यादी तयार केली जाईल. ही यादी विभागीय आयुक्तांकडे पाठवून त्यांच्या मंजुरीनंतर ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल.

Cyber fraud : मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव दहशतवादी हल्ल्यात !

मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात आक्षेप येण्याचे मुख्य कारण म्हणजे, प्रशासनाने १ जुलै २०२५ रोजी उपलब्ध असलेल्या विधानसभा मतदार यादीला आधार मानून नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या याद्या तयार केल्या आहेत. या प्रक्रियेदरम्यान काही नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत, तर काही प्रभागांमधून वगळली गेल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या आहेत.