Political Parties Gear Up for ZP and Municipal Elections
: जागा वाटपाच्या चर्चांना वेग, गटांतर्गत तणाव उफाळणार
Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागताच जिल्ह्यातील राजकीय तापमान झपाट्याने वाढले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. ३० ऑक्टोबरनंतर जागा वाटपाच्या चर्चांना वेग येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही आघाड्या सर्व स्तरावर हालचाली करत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरील गटबाजी, अंतर्गत मतभेद आणि शह-काटशहाचे राजकारण यामुळे समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
महायुतीत ‘तोडगा शोधा’ मिशन सुरू असून, भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात चर्चा सुरू आहे. भाजपने राष्ट्रवादी (अ.प.) गटाशी प्राथमिक चर्चा पूर्ण केली असून आरपीआय (आठवले गट) शीही संपर्क साधला आहे. शिंदेसेना आणि अजित पवार गटामध्ये पुढील टप्प्यात समन्वय बैठक होणार आहे. दरम्यान, बुलढाणा नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदावरून भाजप आणि शिंदेसेनेत धुसफूस निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी तालुका पातळीवर ‘ग्राउंड कनेक्ट फॉर्म्युला’ स्वीकारला आहे. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतरच उमेदवार ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेथे मतभेद होतील, तेथे जिल्हास्तरीय नेते हस्तक्षेप करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Local Body Elections : आम आदमी पार्टीचा उमेदवार ठरला, निवडणुकीसाठी थोपटले दंड!
मेहकर नगराध्यक्ष पदावरून काँग्रेस आणि उद्धवसेना यांच्यातील मतभेद उफाळण्याची शक्यता आहे, तर महायुतीतही जागा वाटपावरून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. एकूणच, बुलढाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या फक्त सत्ता मिळविण्याची नाहीत, तर दोन्ही आघाड्यांच्या अस्तित्वाची कसोटी ठरणार आहेत, हे निश्चित.








