Political Silence Over Irregularities in Voter Lists : राजकारणी व इच्छुकांनीही घेतला नाही आक्षेप, प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह,मतदारांना झाला गोंधळाचा सामना
Dongao आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील त्रुटींनी प्रशासनाचे कामकाज व राजकीय पक्षांचे भान दोन्हीही उघडे पडले आहे. डोणगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये मतदार याद्यांतील नावांमध्ये एवढ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत की, काही नावे वाचताही येत नाहीत. काना, मात्रा, वेलांटी, उकार यांसारख्या स्वरचिन्हांतील गोंधळामुळे मतदाराचे खरे नाव ओळखणे कठीण झाले आहे.
याद्यांमधील या चुकांचा “कळस” निवडणूक विभागाच्या लक्षात कसा आला नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याहूनही गंमत म्हणजे, या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही राजकीय नेत्याने, कार्यकर्त्याने किंवा इच्छुक उमेदवाराने त्यावर हरकती नोंदविल्या नाहीत. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच नव्हे, तर स्थानिक राजकीय इच्छुकांच्या सजगतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Illegal liquer sell : महिलांचे संसार वाचविण्यासाठी ठिय्या आंदोलन; अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार
राज्य निवडणूक आयोगाने २३ सप्टेंबर रोजी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ८ ऑक्टोबर रोजी मेहकर तहसील कार्यालय व पंचायत समिती स्तरावर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती सादर करण्याची मुदत होती. मात्र, इतक्या चुकांनी भरलेल्या याद्यांवर कुणीच आवाज उठवला नाही.
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, काही ठिकाणी नाव, आडनाव आणि वडिलांचे नाव एकत्र लिहिले गेले आहे. तर काही ठिकाणी अक्षरचिन्हांमुळे नावे वाचताही येत नाहीत. या त्रुटींबाबत जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य निवडणूक आयोगाला पत्र देऊन याबाबत कळवले असल्याचे मतदार यादी केंद्राधिकारी विवेक नालट यांनी सांगितले.
NCP Sharad Pawar : शरद पवार गटाने जिल्हाध्यक्ष बदलला, नरेश शेळकेंवर जबाबदारी
दरम्यान, राज्यभरात मतदार याद्यांतील त्रुटींवर विरोधक सातत्याने आवाज उठवत असताना, डोणगाव सर्कलमध्ये झालेल्या या मोठ्या घोळावर मात्र सर्वच पक्ष मौन बाळगत आहेत. त्यामुळे “राजकीय नेते आणि प्रशासन यांना मतदार यादीतील चुकांची जाणीव आहे का?” — हा सवाल मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
मतदार याद्यांमधील अशा त्रुटी केवळ तांत्रिक नसून, त्या लोकशाही प्रक्रियेवर थेट परिणाम करणाऱ्या आहेत. स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांनी जर सजगता दाखवली असती, तर मतदारांच्या नावांच्या अशा चुका टाळता आल्या असत्या. परंतु, राजकीय इच्छुकांचा निष्क्रियपणा आणि प्रशासनाची बेफिकिरी — दोन्हीमुळेच लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.








