Results signal a change in the trend : भाजपचा शहरी धक्का, बदलत्या समीकरणांची नांदी
Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसचा दबदबा थेट किंवा आघाड्यांच्या माध्यमातून दीर्घकाळ दिसून आला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी राजकारणाची दिशा वेगळी होत असल्याचे संकेत सातत्याने मिळत होते. २०१७ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भाजपने राज्यभर मोठी भरारी घेत काँग्रेसच्या पारंपरिक सत्ताकेंद्रांना हादरा दिला होता. त्याच ‘धक्क्याची’ पुनरावृत्ती आता नगरपालिकांच्या निकालांतून होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकांनी राजकीय ध्रुवीकरणात बदलाचे ठळक संकेत दिले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये काँग्रेसचे ८३ नगरसेवक होते; २०२५ मध्ये ही संख्या घटून ६० वर आली—म्हणजेच सुमारे ३८ टक्क्यांची घसरण. याउलट, भाजपचे संख्याबळ ७२ वरून ८९ पर्यंत वाढले, म्हणजेच २३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
Local Body Elections : शिंदेसेनेच्या डावपेचात काँग्रेस पराभूत; भाजपही पेचात!
अध्यक्षपदांच्या पातळीवर चित्र मिश्र असले तरी संदेश स्पष्ट आहे. २०१७ च्या तुलनेत भाजपच्या अध्यक्षपदांच्या जागांत सुमारे १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. काही नगरपालिकांत काँग्रेसने बाजी मारली, तर काही ठिकाणी विरोधी आघाड्यांनी भाजपचा ‘स्वीप’ रोखला; मात्र एकूण राजकीय पटावर भाजपचा वरचष्मा अधिक ठळकपणे जाणवतो.
यावेळी एकूण जागांची संख्या वाढल्याने स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. मागील निवडणुकीत प्रमुख पक्षांना २६७ जागा मिळाल्या होत्या, तर यंदा ही संख्या २८६ पर्यंत पोहोचली आहे. वाढलेल्या स्पर्धेत भाजपला संधीचा फायदा झाला, तर काँग्रेसची पीछेहाट अधिक ठसठशीत झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, शहरी पट्ट्यातील ‘काँग्रेस नंबर वन’ ही जुनी राजकीय धारणा ढासळते आहे का, आणि जिल्हा परिषद निवडणुकांत दिसलेली भाजपची हवा आता पालिकांतही स्थिरावत आहे का, हा प्रश्न अधिक ठळकपणे समोर येत आहे.
सध्याच्या स्थितीत भाजपने चार नगरपालिकांत नगराध्यक्षपद मिळवले, तर काँग्रेसला तीन ठिकाणी नगराध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. उर्वरित ठिकाणी आघाड्या, स्थानिक समीकरणे आणि तिसऱ्या आघाडीचा प्रभाव निर्णायक ठरला.
Local Body Elections : नेतृत्वाची कसोटी, भाजपची सरशी; नियोजनाचा विजय
एकंदरित, बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका निकालांनी शहरी राजकारणात बदलत्या ‘ट्रेन्ड’चा स्पष्ट इशारा दिला असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व विधानसभा समीकरणांसाठी हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.








