Ward structure finalized, now focus on reservation draw : प्रभाग रचना अंतिम, आरक्षण सोडतीवर सर्वांचे लक्ष
Buldhana जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गणांचा अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. अध्यक्षपद, सभापतिपद व गट-गणांच्या आरक्षणावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, इच्छुकांनी गुपचूप ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
२०१६-१७ मध्ये झालेल्या शेवटच्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ मार्च २०२१ मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावेळी आरक्षणाची सोडत मुंबईत होणार असून, त्याचवेळी मतदार याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
Sanjay Gandhi Scheme : निवेदनानंतरही मानधन नाही, विरोधकांचे मिरवणुकीतून ठिय्या आंदोलन
मागील निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी आरक्षित होते. नव्या रचनेत ६१ गट व १२२ गणांचे सीमांकन बदलल्याने अनेकांचे राजकीय गणित कोलमडले आहे. संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी आणि कार्यकर्त्यांच्या हालचाली जोरात सुरू आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारंपरिक ताकद असलेल्या काँग्रेसने निवडणूक तयारीसाठी जून महिन्यातच बैठक घेतली आहे. प्रदेशाध्यक्षांचा प्रभाव आणि काँग्रेसचे गटस्तरीय जाळे यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा दबाव वाढला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर काँग्रेस गटांचे समीकरण आणखी बदलण्याची चिन्हे आहेत.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत होणार लढत
या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा जागावाटपात महाविकास आघाडीचे गणित बिघडले होते. त्याचा परिणाम आता जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार का, याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
गेल्या दीड महिन्यात आघाडीतील नेत्यांच्या जिल्ह्यातील बैठका सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या ‘ओबीसी जागर यात्रेत’ही जिल्हा परिषद निवडणुकीचा मुद्दा अग्रस्थानी होता. काँग्रेसला प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस निर्णायक ठरेल, असे संकेत मिळत आहेत.
Local Body Election : आरक्षण अधिसूचना जाहीर; अनेकांचे गणित बिघडण्याची शक्यता
महायुतीत देखील संघर्षाचे वातावरण दिसत आहे. शिंदेसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी १८ जुलै रोजी शेगाव येथे बैठक घेऊन संघटन वाढवण्याचे आवाहन केले. तर भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी मेहकर व लोणार येथे बैठका घेऊन शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती आखली आहे. त्यामुळे शिंदेसेनेत भाजपबद्दल असंतोष आहे.त्यातही जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात नेहमी सुरू असलेल्या धुसफुशीचा महायुतीवर परिणाम होत असतो.








