mahadev-munde-murder-case-narco-brain-mapping-sit-update : आज दोघांची नार्को, एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी, दोन वर्षांनंतरही आरोपी फरार
Mumbai : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात तपास यंत्रणांनी निर्णायक पाऊल उचलले असून आज दोघांची नार्को चाचणी आणि एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून सुरू असून, मुंबईतील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत या वैज्ञानिक चाचण्या पार पडणार आहेत. दोन वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतरही या हत्येप्रकरणी एकाही आरोपीला अटक झालेली नसल्याने प्रकरणाबाबत सर्वसामान्यांमध्ये तीव्र उत्सुकता आणि संताप व्यक्त होत आहे.
विशेष तपास पथकाने सात संशयितांच्या नार्को चाचणीचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला होता. त्यापैकी एका संशयिताला यकृताचा गंभीर त्रास असल्याने वैद्यकीय कारणास्तव त्याची चाचणी रद्द करण्यात आली. उर्वरित सहा जणांच्या चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी तिघांची नार्को चाचणी पूर्ण झाली असून ते सर्वजण महादेव मुंडे यांच्याशी आर्थिक व्यवहारातून संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. आज ज्या तिघांची चाचणी होणार आहे, त्यातील दोघे वाल्मीक कराड यांच्या घरी कामाला असल्याची माहिती आहे, तर तिसरा त्यांचा निकटवर्तीय मित्र असल्याचे सांगितले जाते.
Sunetra pawar : सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांना स्पष्ट समज, देवगिरी बंगल्यावर काय घडलं ?
गेल्या सहा महिन्यांत विशेष तपास पथकाने सुमारे दोनशे लोकांची चौकशी केली आहे. शंभरपेक्षा अधिक संशयितांची नावे समोर आली असून पाचशेहून अधिक जणांचे दूरध्वनी तपशील तपासण्यात आले आहेत. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट म्हणून काम करत असल्याने पैशांच्या व्यवहारातून वैर निर्माण झाले का, या दिशेने तपास केंद्रित करण्यात आला आहे. याशिवाय प्लॉटिंग व्यवहार, वैयक्तिक वाद, कौटुंबिक कारणे अशा सर्व अंगांनी तपासाची साखळी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
२० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यातील परळीतील तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र इतका कालावधी उलटल्यानंतरही आरोपींचा शोध लागलेला नाही. भाजप आमदार सुरेश धस यांनी ही हत्या केवळ बारा गुंठे जमिनीच्या वादातून झाल्याचा दावा केला होता. त्यांनी वाल्मीक कराड आणि त्यांच्या मुलावर संशय व्यक्त केला होता. तसेच वाल्मीक कराड यांचे सहकारी बाळा बांगर यांनीही काही दिवसांपूर्वी या प्रकरणात गंभीर आणि खळबळजनक आरोप केले होते.
Pune land scam : पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना समितीकडून क्लीन चिट!
वैज्ञानिक चाचण्यांच्या माध्यमातून तपासाला निर्णायक दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष तपास पथकाने आता अंतिम टप्प्यातील पुरावे गोळा करण्यावर भर दिला असून, या चाचण्यांनंतर प्रकरणात महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मुंडे कुटुंबीय आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.








