3578 beneficiaries of the homeless increased, action will be taken against the Tehsildar : दोन कोटी दोन लाख एक हजार २९० रुपयांचा अपहार
Yavatmal : निराधार योजनांचे लाभार्थी वाढवून महागाव येथील तत्कालीन तहसीलदाराने ६५ लाख ३० हजार १०० रुपयांचा घोळ घातला आहे. विभागीय चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी राम मुळे यांनी हा अहवाल कार्यवाहीसाठी विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
महागाव तालुक्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ व श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेचे ५७७८ लाभार्थी दाखवून एप्रिल २००९ ते डिसेंबर २०१२ या कालावधीत दोन कोटी दोन लाख एक हजार २९० रुपयांचे वाटप करण्यात आले. या काळात तहसीलदार म्हणून किरण सावंत-पाटील कार्यरत होते. लाभार्थी संख्येविषयी साशंकता असल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीनस्थ चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.
चौकशीमध्ये तहसीलदार सावंत यांनी घातलेला घोळ पुढे आला. प्रत्यक्ष लाभार्थी संख्येपेक्षा ३५७८ लाभार्थी अधिक आढळून आले. चौकशी अहवालामध्ये निराधारांची प्रकरणे तहसीलदारांपुढे तपासणीसाठी ठेवल्याचे दिसून आले नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे. ही प्रकरणे नोंदवहीमध्ये घेतल्या गेली नाही. अनुदान प्राप्त करतेवेळी मंजूर लाभार्थ्यांची यादी तहसीलदारांपुढे नव्हती, असा उल्लेख करण्यात आला आहे.
Collector of Yavatmal on March Ending: जिल्ह्याला मिळालेला एकही रुपया शिल्लक ठेवू नका!
प्रकरणे उपलब्ध नसतानाही किरण सावंत-पाटील यांनी अनुदानाचे वितरण करून शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. अनुदान वाटपातील अनियमिततेला तेच जबाबदार आहेत. त्यांनी शासकीय कामात सचोटी आणि कर्तव्यपराणता राखली नाही. त्यांनी नियमांचा भंग केला आहे, असे दोषारोप ठेवण्यात आले आहे. यामुळे किरण सावंत-पाटील यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
महागाव येथे निधीवाटपात झालेल्या अनियमिततेबाबतचा चौकशी अहवाल विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशीअंती पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.








