Expansion of metro in three years : पुढील तीन वर्षांत होणार काम; विस्ताराच्या कामाने वेग घेतल्याचा दावा
Nagpur मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यासाठी १२०० कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. ऑटोमोटीव्ह चौक आणि प्रजापतीनगरकडील कामांनी वेग घेतला आहे. मुदतीत काम करायचे असल्याने आणखी मनुष्यबळात वाढ होईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले. कन्हान आणि हिंगण्यापर्यंत मेट्रो कधी धावणार याची आता प्रतिक्षा नागरिकांना लागली आहे.
दुसऱ्या टप्प्यात मेट्रो ४३.८ किलोमीटर मार्गावर धावेल. ट्रान्सपोर्ट नगर (कापसी) आणि पश्चिमेकडील हिंगणा, उत्तरेकडील कन्हान, दक्षीणेतील बुटीबोरी एमआयडीसीपर्यंत मेट्रो पोहोचेल. फेज १ आणि फेज २ मिळून नागपुरात मेट्रोचे ८३.८ किलोमीटरचे जाळे तयार होणार आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ६ हजार ७०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
४३.८ किलोमीटर मार्गावर ३८ स्टेशन राहणार आहेत. यात केंद्रसरकार २० टक्के, राज्यसरकार २० टक्के, एमएडीसीचे ३ टक्के, एमआयडीसीचे ३ टक्के आणि पीपीपीच्या माध्यमातून १५० कोटी असा निधी खर्च होणार आहे. उर्वरित निधी कर्ज स्वरूपात उभा केला जात आहे.
रिच २ मध्ये म्हणजे आटोमोटिव्ह चौक ते कन्हान या मार्गावर कामाने गती घेतली आहे. रिच ३ मध्ये म्हणजे लोकमान्य नगर ते हिंगणा या मार्गावरही कामे सुरू झाली. पायलिंगचे काम झाले असून कास्टिंग यार्डमध्ये सेगमेंट तयार केले जात आहे. व्हायडक्ट तयार करण्याच्या सर्व निविदा काढण्यात आले आहेत. स्थानकाच्या दोन निविदा प्रक्रियेत आहे.
आटोमोटिव्ह चौक ते कन्हान हे अंतर १३ किलोमीटरचे असेल. मिहान ते बुटीबोरी ईएसआर हे अंतर १८.७ किलोमीटरचे, तर प्रजापती नगर ते ट्रांसपोर्ट नगर हे अंतर ५.५ किलोमीटरचे आहे. लोकमान्य नगर ते हिंगणा हे अंतर ६.६ किलोमीटरचे असेल.
रिच चारमध्ये पारडीकडेही कामाला सुरुवात होत आहे. ‘आरव्हीएनएल’ (रेल विकास निगम लिमिटेड), जीआर इन्फ्रा लि., कल्पतरी या तीन कंपन्यांना व्हायडक्टचे काम दिले आहे. स्थानक तयार करण्याचे काम ‘आरव्हीएनएल’ला दिले आहे. ओरिसा, बंगाल, बिहार या राज्यांतून १२०० मनुष्यबळ आले असून लवकरच दोन हजार कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेतले जाईल, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.