Nilkanth Cooperative Spinning Mill will be restarted : शेतकऱ्यांना दिलासा, रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता
Akola पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अकोल्यातील दि. निळकंठ सहकारी सूतगिरणी मर्यादित पुन्हा सुरू करण्यास विशेष बाब म्हणून शासनाने मंजुरी दिली आहे.
शेतकऱ्यांचे कायम हित जोपासणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखालील महायुती सरकारचा हा निर्णय पश्चिम विदर्भातील उद्योग व रोजगाराला गती देणारा ठरणार आहे. या निर्णयाबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
१९७० मध्ये दिवंगत निळकंठ श्रीधर उपाख्य नानासाहेब सपकाळ (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्या दूरदृष्टीतून या सूतगिरणीची स्थापना झाली. स्थापनेपासून तब्बल ३८ वर्षे सतत उत्पादन चालू राहिले. दर्जेदार सूत निर्मितीसोबतच शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारभावापेक्षा जास्त दर मिळावा, यासाठीही सूतगिरणीने महत्त्वाची भूमिका बजावली.
Amol Mitkari : लाडक्या बहिणींना अजितदादांनी दिल्या जास्तीत जास्त योजना
तथापि, काही तांत्रिक अडचणींमुळे उत्पादन बंद झाले. परिणामी, स्थानिक रोजगारावर व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम झाला. पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मूल्यवर्धित दर मिळावा, स्थानिक तरुणांना रोजगारनिर्मितीची संधी मिळावी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने सूतगिरणी पुनश्च सुरू होणे महत्त्वाचे ठरत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सहकारी सूतगिरणीचे पुनरुज्जीवन होत असून, शेतकऱ्यांच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.








