Harshawardhan Sapkal is new Congress President for Maharashtra : काँग्रेस श्रेष्ठींचा विदर्भावरच विश्वास; नावांचा सस्पेंस संपला
Mumbai नाना पटोले Nana Patole यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याबाबत तीन महिने सस्पेंस कायम होता. अनेक नावांची चर्चाही झाली. अखेर गुरुवारी काँग्रेस श्रेष्ठींनी निर्णय घेत बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी नियुक्ती पत्र जारी केले. विशेष म्हणजे काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्षपदासाठी विदर्भावरच विश्वास ठेवला, याची चर्चा अधिक होत आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात दणक्यात कमबॅक केले होते. त्यावेळी नाना पटोले यांच्या नेतृत्वाचे कौतुक झाले होते. काँग्रेस हायकमांडच्या गुडबुकमध्ये पटोले अग्रस्थानी पोहोचले होते. ज्या महाराष्ट्रात २०१४ आणि २०१९ या लोकसभा निवडणुकांमध्ये फक्त एक खासदार निवडून येऊ शकला होता. त्याच महाराष्ट्रात पटोलेंच्या नेतृत्वात तब्बल १३ खासदार निवडून आले.
Kailas Vijayvargiya : बंगालमधील मदरशांमध्ये देशविरोधी शिक्षा दिली जाते !
त्यामुळे विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात पटोलेंच्याच नेतृत्वात होणार, हे निश्चित होते. मात्र, निकाल उलटाच लागला. काँग्रेसला अंतर्गत राजकारणाचा फटका बसला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राजी-नाराजी वाढली. काँग्रेसला मोठा पराभव सहन करावा लागला. अख्खी महाविकास आघाडी मिळून जेमतेम ५० जागांपर्यंत मजल मारू शकली. लोकसभेतील यशाचे श्रेय पटोलेंना देण्यात आले, त्याप्रमाणे विधानसभेतील अपयशही त्यांच्याच नावावर नोंदविण्यात आले.
पटोलेंवर सातत्याने आरोप होऊ लागले. पक्षातीलच नेते त्यांच्या विरोधात जाहीरपणे बोलू लागले. त्यामुळे पटोलेंनी राजीनामा दिला. पण काँग्रेसने तो राजीनामा स्वीकारला किंवा नाकारला, हे कळायला मार्ग नव्हता. गेले तीन महिने नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावांची मात्र जबरदस्त चर्चा रंगली. यात अमित देशमुख, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार आदींची नावे चर्चेत आली. अनेकांनी तर स्वतःच दावे केले होते. काँग्रेसने सपकाळ यांची नियुक्ती जाहीर करून या संपूर्ण सस्पेंसला पूर्णविराम दिला आहे.
Pankaja Munde : छगन भुजबळांशी जवळीक कशी? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं !
सपकाळांपुढे मोठे आव्हान
काँग्रेसची महाराष्ट्रात वाताहत झालेली असताना सपकाळ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्ष संघटनेची घडी बसविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यात पक्षातील अंतर्गत राजकारणावरही मात करत त्यांना पुढे जायचे आहे, हे महत्त्वाचे.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून आहे. मूळचे बुलढाण्याचे असलेले सपकाळ यांनी महात्मा गांधी तथा विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारीत समाजकारण केले आहे. ते सध्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. १९९९ ते २००२ मध्ये ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. याशिवाय २०१४ मध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते.