Youth Congress Akrosh march from March 15 : सद्भावना यात्रेनंतर युवक काँग्रेसची आक्रोश पदयात्रा
Nagpur राज्यात वाढलेली बेरोजगारी, राजकीय गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला घेरण्यासाठी युवक काँग्रेसने पुणे ते मुंबई अशी पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याची इच्छाशक्ती काँग्रेसमध्ये दिसून येत नव्हती. परंतु प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshawardhan Sapkal व त्यानंतर युवक काँग्रेसने पुण्यातून मुंबईपर्यंत युवा आक्रोश पदयात्रा काढण्याचा निर्धार केला. आणि कधी कधी काँग्रेसला जाग येत असल्याचे दाखवून दिले आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे येत्या १५ ते १९ मार्चपर्यंत ही पदयात्रा काढली जाणार आहे. पुण्यातील लाल महाल येथून येत्या १५ मार्चला या पदयात्रेची सुरूवात होणार आहे. यावेळी अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभानू चिब उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्रचे प्रभारी रमेश चेन्नीथला Ramesh Chennithala, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील Satej Patil, माजी मंत्री विश्वजीत कदम Vishwajit Kadam प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
बेरोजगार युवकांना न्याय देण्यासाठी, झोपलेल्या महायुती सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्राचा हक्काचा रोजगार इतर राज्यात जाऊ न देण्यासाठी ही पदयात्रा असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत Kunal Raut यांनी म्हटले आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके Bunty Shelke देखील फूल्ल फॉर्मात आहेत. यापूर्वी त्यांनी नागपुरात अनेक आंदोलने करून लक्ष वेधून घेतले आहे. आता थेट पुण्यातून पदयात्रा येत्या १९ मार्चला विधानभवनावर धडकणार आहे.
महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवा आक्रोश पदयात्रेत प्रत्येक जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते 15 मार्चला पुणे येथे उपस्थित राहणार आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते 14 मार्च ला रात्री नागपूर येथून पुण्याकडे रवाना होणार आहेत. या पदयात्रेत राज्यातील सर्व प्रमुख नेते टप्यानुसार पदयात्रेत सामील होतील, अशी माहिती युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास नालमवार यांनी दिली आहे.