Congress MLA Vikas Thackeray alleges that BJP leader Nitin Gadkari and Devendra Fadnavis are responsible for the poor condition of Nagpur : कुठे आहेत १ लाख कोटी रुपयांची कामे ?
Mumbai : नागपुरात रविवारपासून (६ जुलै) पावसाची संततधार सुरू आहे. पहिले दोन दिवस ठीकठाक गेले. पण कालपासून नागपुरात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाल्यांचे पाणी लोकांच्या घरात शिरून साहित्य वाहून जात आहे. लोकांच्या गाड्या पाण्यात वाहून जातात. भाजप नेते नेहमी सांगतात की नागपुरात १ लाख कोटी रुपयांची कामे करून आम्ही विकास केला. हाच का तो विकास, म्हणत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आज सभागृहात धो-धो पावसापेक्षाही जास्त जोरात सत्ताधाऱ्यांवर बरसले.
नागपुरातील पूर परिस्थितीवर विकास ठाकरे यांनी आज (९ जुलै) आवाज उठवला. ते म्हणाले, गेल्या
दोन दिवसांपासून सर्व न्यूज चॅनल्सवर फक्त नागपूर आणि नागपूरच दिसत आहे. सततच्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भीतीमुळे रात्रभर लोक झोपू शकले नाहीत. नागपूर महानगरपालिका गेल्या १५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री नागपुरातच राहतात. वारंवार एक लाख कोटी रुपयांची कामे करून नागपूरचा विकास केल्याचे सांगतात. हाच आहे का त्यांचा विकास?
Bacchu kadu : मुख्यमंत्री विदर्भाचा आहे, पण शेतकऱ्यांच्या कामाचा नाही!
१ लाख कोटींचा विकास..
१ लाख कोटी रुपयांची विकास कामे केल्यानंतर नागपूरची परिस्थिती अशी का आहे, हा संशोधनाचा विषय आहे. मागच्या पावसाळ्यात कार, जिवनावश्यक साहित्य पाण्यात वाहून गेले. उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या रहाटे कॉलनीतही अशीच परिस्थीती होती. एक लाख कोटीची कामे केल्यावर ही स्थिती का व्हावी? हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस नागपूरचा सत्यानाश होणार, हे निश्चित. लोकांना न्याय कोण देणार आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने नागपूर शहरातील ज्या लोकांचे नुकसान झाले, त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, असे विकास ठाकरे म्हणाले.
Harshwardhan sapkal : गुंडगिरी करणाऱ्या गायकवाडला पक्ष कसा पाठीशी घालतो?
नदी, नाल्यांच्या सफाईचे काय ?
लोकांनी २५-२५ वर्ष मेहनत करून घेतलेल्या गाड्या आणि इतर संपत्तीची वाट लागत आहे. याचे शासनाकडे काय उत्तर आहे? नाग नदी, पिली नदी, पोहरा नदीच्या रुंदीकरण आणि साफसफाई करण्यासाठी शासनाने पैसे दिले. एक वर्षात काय काम झाले, असा सवाल ठाकरे यांनी केला. त्या पैशांतून खरंच कामे झाली असती, तर आज ही स्थिती झाली नसती. केवळ आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे, तर ही अवस्था झाली. अधिक पाऊस झाल्यास काय होणार, याची कल्पनाही न केलेली बरी, असे ठाकरे म्हणाले.
जनतेच्या पैशाची सफाई..
काम न होताच बिलं उचलण्यात आली. नदी, नाल्यांची सफाई झाली असती, तर आज ही स्थिती नसती. सफाई फक्त जनतेच्या पैशांची झाली आहे. सत्तेतील वजनदार लोक नागपुरात राहतात. पण या प्रशासनावर कुणाची पकडच नसेल, प्रसासकीय अधिकारी यांच्या नियंत्रणात नसतील, तर जनतेने कुणाकडे पाहावे, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.
कामांचे ऑटीट करा..
मागच्या वर्षी किती पैसे दिले, काय – काय कामे झाली, याचे ऑडीट करावे. पुढील पावसाळ्यात अशी स्थिती येणार नाही, अशी ग्वाही सरकारने मागच्या वर्षी दिली होती. येथे आमचे सहकारी कृष्णा खोपडे बसले आहेत. त्यांच्या मतदारसंघातही जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. महानगरपालिका तीन वर्षांपासून प्रशासक चालवत आहे. हे प्रशासक काय काम करत आहेत, याकडे कुणाचे तरी लक्ष आहे का, असाही सवाल विकास ठाकरे यांनी केला.