Journalists can reserve seats in ST Bus from home : मुख्यमंत्र्यांनी दिले सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश, परिवहन मंत्र्यांची माहिती
Mumbai : एसटी प्रवासासाठी पत्रकारांना सद्यस्थितीत ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध नाही. पण येत्या १५ ऑगस्टपासून ऑनलाईन सीट आरक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पुढील महिन्यापासून घरबसल्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी सीट आरक्षित करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पत्रकारांना अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलतीदेखील लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी बस प्रवासाच्या सवलतींच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : गोवंशाचे मुंडके कापून फेकले, प्रवीण दटके आक्रमक !
बैठकीला मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे, खजिनदार विनोद यादव, कार्यकारिणी सदस्य प्रशांत बारसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत पत्रकारांना साध्या, निआराम व शिवशाही बसमध्ये १०० टक्के भाड्याची सवलत मिळते. मात्र या सवलतीवर आठ हजार किलोमीटरची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. ही मागणी मंजूर करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याचेही सरनाईक यावेळी म्हणाले.
पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे CM Devendra Fadnavis यापूर्वी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही सरनाईक म्हणाले. या मागणीबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले.