Forest department’s negligence towards tree felling in Chikhali : मनसेचा आरोप, शिष्टमंडळाने घेतली उपवनसंरक्षकांची भेट
Buldhana चिखली शहर व तालुक्यात बिनधास्तपणे सुरू असलेल्या वृक्षतोडीला वन विभागाचं समर्थन असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. लाकूड साठवण करणारे ठिय्ये, वृक्षतोड करणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक, बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील जाफ्राबाद रोडलगत असलेल्या मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात आहेत. या झाडांचे लाकूड साठवून ठेवले जाते आणि वाळल्यानंतर नेले जाते. नंतर पुन्हा नव्याने वृक्षतोड सुरू होते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून वन विभागाला माहिती असूनही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असतानाही त्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे टाळले आणि उलटपक्षी लाकूड साठवणाऱ्या व्यक्तींना खबरदारी घेत लाकूड हलविण्यास भाग पाडले, असा दावा मनसेने केला आहे.
या सर्व प्रकारामध्ये स्थानिक वन अधिकारी व वनपाल यांचे कथित सहकार्य असल्यामुळे हजारो वृक्षांची तोड सातत्याने सुरू आहे, असा ठपका मनसेने ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, मधुकर ठेंग यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.