Fadnavis is at the center of great power and good wishes : फडणवीस केंद्रात मोठ्या पदावर जावोत’ अशीही शुभेच्छा
Mumbai : कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुढच्या आषाढी एकादशीसाठी वेगळंच साकडं विठ्ठलाला घातलं आहे. “आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, हेच आमच्यासाठी विठ्ठलाचं राज्य आहे,” अशी प्रार्थना मिटकरींनी केली आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त अकोल्यातील आरोग्यनगर भागातील आपल्या निवासस्थानी आयोजित भजन कार्यक्रमात आमदार मिटकरींनी संत नामदेवांचा “विठ्ठलाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी” हा अभंग गायला. याच भावनेचा संदर्भ घेत त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, हे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं स्वप्न बोलून दाखवलं. “माझ्या प्रार्थनेला विठ्ठल नक्कीच पावेल, असा मला विश्वास आहे,” असे ते म्हणतात.
अमोल मिटकरी म्हणाले, “आमचा नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर असावा, ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर तेच विठ्ठलाचं राज्य ठरेल.” पुढे ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मोठ्या जबाबदारीच्या पदावर जावेत. त्यांची लोकप्रियता देशभर पसरली आहे, हे बिहारच्या निवडणुकीत दिसून आलं. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी आता अजितदादांनी घ्यावी, अशीच आमची अपेक्षा आहे.”
या विधानाने महायुतीत नव्या चर्चेला उधाण आलं आहे. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच “२०२९ पर्यंत मी राज्यातच राहणार” असं स्पष्ट केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मिटकरींचं हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचं केंद्र ठरलं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांमध्ये पुढे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मिटकरींच्या विधानाला अधिक राजकीय अर्थ प्राप्त झाला आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच टीका करताना म्हटलं होतं की, “भाजपला आता शिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्यांची गरज संपली आहे, त्यामुळे भाजप लवकरच या कुबड्या जाळेल.” या टीकेवर अमोल मिटकरींनी जोरदार पलटवार करत रोहित पवारांना निशाणा साधला. “घरी नाही दाणा, तरी बाजीराव म्हणा, अशी अवस्था रोहित पवारांची झाली आहे,” असा चिमटा मिटकरींनी काढला.
womens world cup : इतिहास रचला, भारतीय महिलांचा विश्वविजयी जल्लोष!
ते म्हणाले, “रोहित पवार यांना महायुतीच्या मांडीवर बसण्याचे डोहाळे लागले आहेत. यांना ‘लगीन घाई’ झाली आहे, पण कोणाच्या मांडीवर बसायचं, याची नोंद महायुतीच्या डायरीत आहे. आपल्या पक्षाचं दुकान किती उरलंय, हे त्यांनी आधी पाहावं आणि दुसऱ्याच्या घरात डोकावू नये,” असा सल्लाही मिटकरींनी दिला.
मिटकरींच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिंदे-फडणवीस- पवार समीकरणात नवा रंग भरला आहे. एकीकडे रोहित पवार सत्ताधारी गटावर टीका करत असताना, दुसरीकडे अमोल मिटकरींच्या ‘अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत’ या साकड्याने महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि नेतृत्व प्रश्नावर नव्या राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.








