Shindes help to protesters, Rauts serious allegation : शिंदेंकडून आंदोलकांना मदत, राऊतांचा गंभीर आरोप
Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आंदोलकांचा पवित्रा आक्रमक असून “आरक्षण मिळाल्या शिवाय माघार नाही” असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप करत उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला आहे.
राऊत म्हणाले, “महायुती सरकारमध्ये तीन गट आहेत. शिंदे गट वेगळ्या पद्धतीने आंदोलकांना मदत करत आहे आणि त्यामागे फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.” त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत राजकीय वादळ निर्माण केले आहे.
Important decision : सरकारचा महत्त्वाचा निर्णय; कुणबी प्रमाणपत्रावरून दिलासा !
राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, “मराठा आंदोलनावर तोडगा काढायचा असेल तर फडणवीसांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करावी. अहंकार बाजूला ठेवून जरांगे पाटील यांची भेट घेऊन सामूहिक तोडगा शोधायला हवा. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल.”
राऊतांनी महायुतीतील अजित पवारांच्या भूमिकेवरही टीका केली. “अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, त्यांची कोणतीही भूमिका दिसत नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून राजकीय इच्छाशक्ती येणार तरी कुठून?” असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकार हालचाली करत असलं तरी, विरोधकांकडून सतत सरकारवर टीका होत आहे. राऊतांच्या आरोपामुळे आता शिंदे-फडणवीस यांच्यातील समीकरणांवर नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.








