Maharashtras-seva-fortnight started from Wardha : गृह राज्यमंत्र्यांचा पुढाकार; वर्धा जिल्ह्यातून झाली होती सुरूवात
Wardha जिल्ह्यातून सुरू झालेला ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आता राज्यभरात राबविणार असल्याचे नवनियुक्त गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी येथे जाहीर केले. तळागाळातील सर्वसामान्य जनतेला लाभ व्हावा, यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबवीणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येथील विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शासनाकडून जनसामान्यांकरिता विविध योजना राबविल्या जातात. मात्र, योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही. योजना असून चालत नाही तर त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा लागतो.’ चार वर्षांपूर्वी प्रशासनाच्या सहाय्याने आमदार डॉ. पंकज भोयर यांनी येथे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ सुरू केला.
यात एकाच छताखाली 25 शासकीय कार्यालयांचे स्टॉल लावले. तेथे प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. येणाऱ्या नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावत होते. या उपक्रमाची शासनाने दखल घेतली आहे. आता गृह राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागताच डॉ. पंकज भोयर यांनी हा उपक्रम राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
अलिकडच्या काळात शिक्षणाचे महत्त्व ओळखून विविध खासगी संस्थानी नर्सरी स्कूल सुरू केल्या आहेत. त्यासाठी कुणाचीही परवानगी लागत नसल्याने त्यांची संख्या राज्यात लाखाेंच्या घरात आहे. त्याचा अधिकृत आकडा राज्याच्या शिक्षण विभागाकडेही उपलब्ध नाही. त्यांची माहिती शिक्षण विभागाला असावी, यासाठी डेटाबेस तयार करण्यात येत आहे. लवकरच नवीन धोरण तयार करण्यात येणार असल्याचेही शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
शासकीय कामासाठी भरमसाठ पैसा खर्च केला जातो. त्याच्या कामाची देखभाल, दुरुस्ती जबाबदार व्यक्ती टाळतात. अशा कामांचे आता मॉनिटरिंग करण्यासाठी प्रत्येक विभागात ‘मॉनिटर’ नेमणार असल्याचेही डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यात शेत पाणंद रस्त्यांची संख्या अधिक आहे. मध्यंतरी महाविकास आघाडीचे सरकार आले आणि रस्ते कामाची गती मंदावली, असा आरोप त्यांनी केला. आता पुन्हा या कामाला गती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.