A clean bus station will get a reward of 3 crores : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान
Wardha महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभरासाठी राज्यातील सर्व बसस्थानकांत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबविण्यात येत आहे. स्पर्धात्मक स्वरुपात राबविण्यात येत असलेल्या या अभियानात तब्बल तीन कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
‘अ’ वर्गात प्रथम येणाऱ्या बसस्थानकाला एक कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ, सुंदर, टापटिप बसस्थानक आणि निर्जंतुक प्रसाधनगृहे कायमस्वरुपी मिळावीत या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. वर्धा विभागात या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था सहभागी होत आहेत.
संख्येच्या आधारे शहरी ‘अ वर्ग, निमशहरी ‘ब’ वर्ग आणि ग्रामीण ‘क’ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. प्राथमिक फेरीत प्रादेशिकस्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार आहेत. अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. ज्या विभागात बक्षीसपात्र बसस्थानकांची संख्या जास्त असेल त्या विभागाला विशेष प्रशस्तीपत्र आणि चषक देण्यात येणार आहे.
वर्षभर चालणाऱ्या अभियानात तीन महिन्यांनी परीक्षण समितीमार्फत प्रत्येक बसस्थानकाचे परीक्षण करण्यात येणार आहे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या आहेत. उपलब्ध सोयी, बसस्थानकातील स्वच्छता यानुसार बसस्थानकाचे मूल्यमापन केले जाईल. समितीने दिलेल्या गुणांच्या आधारे बसस्थानकांचे क्रमांक ठरविण्यात येतील.
लोकसहभागातून बसस्थानकांचा विकास करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळेच बसस्थानकाचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह, स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, नगराध्यक्ष, शाळा, महाविद्यालये यांची मदत घेतली जाणार आहे.
अभियानात मदत करण्यासाठी इच्छुक मंडळींनी पुढे यावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे. स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना स्वच्छता असल्यामुळे एसटी बसच्या प्रवासाकडे कल वाढू शकतो. यासाठी विभागीय बांधकाम कार्यालयाकडून सर्व आगारांनी बसस्थानकाचा परिसर आणि प्रसाधनगृहाची नियमित स्वच्छता करावी.
रात्रीच्या वेळी विजेचे दिवे सुस्थितीत आणि चालू असावेत. खराब दिव्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. बसस्थानकात कचरा टाकणाऱ्या, थुंकणाऱ्या नागरिकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. यासह बसस्थानकात आवश्यक त्या सर्व सोईसुविधा पुरवाव्यात अशा सूचना केल्या आहेत