Administrative Efficiency Award to Nagpur Municipal Corporation receives : प्रशासकीय गतिमानतेसह नागपूर विभागाला सात पुरस्कार
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर महानगरपालिकेच्या कार्यशैलीवर कायम नाराज असतात. एखादे काम सांगितले की, त्याचा बँड वाजवल्याशिवाय मनपा शांत बसत नाही, अशी नाराजी गडकरी कायम व्यक्त करत असतात. तर फडणवीस यांचेही काही वेगळे मत नाही. पण तरीही नागपूर महानगरपालिकेला चक्क प्रशासकीय गतीमानतेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सर्वसामान्य माणसाला नागपूर महानगरपालिकेत एखादे काम निघावे आणि ते सहज पूर्ण व्हावे, ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. नागपूर शहरात दहा झोन ऑफीस आहेत. तर एक सिव्हिल लाइन्स येथील मुख्यालय आहे. पण कोणत्याही कार्यालयात कर भरण्याची प्रक्रिया जेवढी सोपी आहे, तेवढे कुठलेच काम सोपे नाही. टाळाटाळ, निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, दुर्लक्ष करणे या वैशिष्ट्यांसाठी कर्मचारी आणि अधिकारी ओळखले जातात. अशा परिस्थितीत शासनाचा पुरस्कार जाहीर होणे, आश्चर्याचे मानले जात आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानाची माहिती घेण्यासाठी ‘ई-पंचनामा ॲप’ हा उपक्रम राबविला होता. त्याची दखल घेत आयुक्त कार्यालयाला 2023-24 चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, नागपूर व चंद्रपूर महानगरपालिका, नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हा परिषद आणि गडचिरोली जिल्ह्यातील नायब तहसिलदार यांना वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 चे प्रशासकीय गतिमानता पुरस्कार जाहीर झाले आहेत.
2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षात राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान” राबविण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांचे विविध निकषांवर परीक्षक मंडळाकडून परीक्षण करुन निकाल तयार करण्यात आला. 26 मार्च 2025 ला शासन निर्णयाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला.
Buldhana News : निर्लज्ज अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवून रास्ता रोको करणार !
महानगरपालिकांच्या श्रेणीमध्ये नागपूर महानगपालिकेने आर्थिक नियोजनासाठी विकसित केलेल्या ‘फायनान्शीयल अकाऊंटींग सिस्टिम’ करिता प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. 10 लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच श्रेणीमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 लाख रूपये रोख असे या पुरस्कारचे स्परूप असून महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता अवलंबीलेल्या विशेष पद्धतीची दखल घेण्यात आली आहे.