Corruption of 1 crore rupees in ‘Mazi Vasundhara’ campaign : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा (माकप) गंभीर आरोप
Amravati नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा अभियान २.०’मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) Marxist Communist Party केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माकपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राज्य शासनाने ‘माझी वसुंधरा अभियान २.०’ अंतर्गत उच्च कार्यक्षमता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षीस निधी मंजूर केला. त्यानुसार नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीला १ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. मार्च २०२४ मध्ये यवतमाळ, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील चार सहकारी संस्थांबरोबर करारनामा करून कामाला सुरुवात झाली.
Guardian Secretary Saurabh Vijay : दरडोई उत्पन्न वाढीसाठी क्रमवारीत सुधारणा आवश्यक
मात्र ११ महिन्यानंतरही अभियानाची अंमलबजावणी अपयशी ठरली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. लावलेली झाडे पाण्याअभावी सुकली, रोपांचे संगोपन झाले नाही, लोखंडी ट्री-गार्ड लावण्यात आले नाहीत, नदी-नाले पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाचे कोणतेही काम झाले नाही. परिणामी, बक्षीस निधीचा अपव्यय झाला असल्याचे दिसून येते, असे माकपने नमूद केले आहे.
या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे. कंत्राटदारांना आतापर्यंत १२ लाख रुपये अदा करण्यात आले, मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या रकमेचे कोणतेही ठोस काम दिसत नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
“अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे कंत्राटदाराने मनमानी केली. प्रत्यक्ष पाहणी न करता निधी वितरित करण्यात आला. हे अभियान पूर्णतः अपयशी ठरले आहे,” असे माकपचे तालुका सचिव कॉ. श्याम शिंदे यांनी स्पष्ट केले.
दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माकपने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.








