payments of Shiv Bhojan centers are in arrears for nine months : निधीअभावी शिवभोजन केंद्रांची देयके नऊ महिने थकीत; अकोला जिल्ह्यातील ५४ केंद्रांची चार कोटी रुपयांची थकबाकी
Akola राज्यातील गरिबांना माफक दरात अन्नपुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेला निधीअभावी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून देयके थकित असल्याने अनेक केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अकोला जिल्ह्यातील ५४ केंद्रांची नोव्हेंबर २०२४ पासून एकूण चार कोटी रुपयांची देयके थकीत असल्याचे समोर आले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सुरू करण्यात आलेली ही योजना महायुतीच्या काळात मात्र अडचणींचा सामना करीत आहे.
ही योजना जानेवारी २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती. राज्यभरात सध्या १,८८४ शिवभोजन केंद्रे कार्यरत असून, दररोज सरासरी १,६८,७२४ थाळ्यांचे वितरण केले जाते. ही केंद्रे मुख्यतः सरकारी रुग्णालये, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि एसटी बसस्थानकांमध्ये कार्यरत आहेत.
Maharashtra politics : बबड्या, बबड्याचा बाबा आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करा
राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांकडून दर पंधरवड्याला अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे देयकांची मागणी केली जाते. मात्र ऑक्टोबर २०२४ पासून विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने देयके अदा करण्यात आलेली नाहीत. जुलै महिन्यात अकोला जिल्ह्यासाठी केवळ ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता, ज्यातून एक ते दीड महिन्यांचीच थकबाकी भागविण्यात आली. उर्वरित चार कोटी रुपयांची रक्कम अद्याप प्रलंबित आहे.
“गेल्या नऊ महिन्यांपासून देयके मिळालेली नाहीत. त्यामुळे अनेक केंद्र चालकांवर पुरवठादारांचे पैसे थकले आहेत. व्यवस्थापन खर्चही भागवणे कठीण झाले आहे, असे शिवभोजन केंद्रचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी म्हटले. निधीअभावी देयके रखडली होती. सध्या काही निधी प्राप्त झाला आहे. त्यातून काही देयके अदा करण्यात आली आहेत. उर्वरित थकबाकी निधी उपलब्ध होताच अदा केली जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.








