PWD contractors stopped the work across the statea : पीडब्ल्यूडी कंत्राटदारांचे राज्यभर काम बंद!: राज्य शासनाचे दुर्लक्ष, विकासकामे थांबण्याची शक्यता
Nagpur सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी (पीडब्ल्यूडी)राज्य शासनाविरोधात एल्गाराची भूमिका घेतली आहे. राज्यभरातील विविध कामांची ६४ हजार कोटींची देयके थकीत असल्यामुळे राज्यभर काम बंद करण्याची घोषणा केली आहे. नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन मुख्य अभियंता यांच्याकडे सादर केले आहे. यामुळे उपराजधानीसह राज्यभरात सुरू असलेले रस्ते, पुलासह विविध विकासकामांना फटका बसण्याची शक्यता आहे. आता थांबण्याची शक्यता आहे.
सिव्हिल लाइन्समधील पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंता कार्यालयात कंत्राटदारांनी एकत्र येत थकबाकीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. राज्यभरातील सुमारे १ लाख कंत्राटदारांचे सुमारे ६० हजार कोटी रुपये थकीत आहेत. अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून खर्च केला आहे. या थकबाकीसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये काम बंद केले जाणार आहे.
नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे म्हणाले, अडीच वर्षे पूल, रस्ता, इमारत आदी कामांची बिले थकीत आहेत. निवडणुका, उत्सव येतात. तेव्हा काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांवर दबाव आणला जातो. मात्र, काम पूर्ण झाल्यावरही बिल काढले जात नाही.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे इतर कामांसाठी निधी अपुरा पडत आहे, अशी शंका कंत्राटदारांनी व्यक्त केली आहे. कंत्राटदारांनी निवेदन सोपविल्यानंतर त्यावर अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे राज्य सरकार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे कंत्राटदारांचे लक्ष लागले आहे.
कार्यालयात जमलेल्या कंत्राटदारांमध्ये संजय मैंद, नितीन साळवे, रूपेश रणदिवे, शशिकांत कापसे, सारंग पनवेलकर, पराग मुंजे, राकेश आसट, नरेश खुमकर, जीतू श्रीवास्तव, कौशिक देशमुख, अनिल इखनकर, सतीश निकम, कृष्णा हिंदुस्तानी आदींचा समावेश होता.