Cases have been registered against the attackers : पोलिस आणि वनविभागात गुन्हे दाखल, जमावाने केला होता हल्ला
Buldhana मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा तसेच वनविभागात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाही कायद्याच्या चौकटीत आणि नियमानुसार करण्यात आली असल्याची माहिती उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
दि. २३ जुलै २०२५ रोजी अवैधरित्या बांधलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर १००-१५० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वनविभागाचे ५, पोलिस विभागाचे ८ आणि SRPF चा १ जवान गंभीर जखमी झाला. दगडफेक, मिरची पावडर, काठ्या-कोयत्यांचा वापर करून सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. जेसीबी आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड झाली.
सदर अतिक्रमणधारकांनी वनहक्क कायद्यानुसार शेतीसाठी दावे केले होते, मात्र २०२२ आणि २०२४ मध्ये दोन्ही वेळा दावे नामंजूर झाले. त्यानंतर वाजवी सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र, ३० जून २०२५ रोजी पुन्हा अवैधरित्या अतिक्रमण करून झोपड्या उभारण्यात आल्या. यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना हटण्याचे निर्देश दिले, पण ते राजकीय संरक्षणाच्या आशेने तिथेच ठाण मांडून राहिले, असा आरोप स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणामध्ये वनविभागाची कायदेशीर कार्यवाही ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरत आहे. अतिक्रमणधारकांकडून काही स्थानिक नेत्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर दबाव आणण्याचेही प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. मात्र, उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी स्पष्टपणे सांगितले की, “संपूर्ण कारवाई ही नियम व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यात आली असून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कर्तव्य पार पाडले जात आहे.”
Vidarbha Farmers : शेती उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल, मदतीची फक्त घोषणाच!
मे महिन्यात वनविभागाने राजुर वर्तुळातील सुमारे 400.087 हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करून जल व मृदसंधारणाची कामे सुरू केली होती. या क्षेत्रावर लवकरच वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.